पुजारीच्या हालचालींनी पोलीस सतर्क
By Admin | Updated: September 29, 2014 07:31 IST2014-09-29T07:29:36+5:302014-09-29T07:31:43+5:30
कुख्यात डॉन छोटा राजनचा एकेकाळचा साथीदार असलेला रवी पुजारी अलिकडच्या काळात गुन्हेगारी कारवायांमध्ये कमालीचा सक्रिय झाला आहे

पुजारीच्या हालचालींनी पोलीस सतर्क
पुणे : कुख्यात डॉन छोटा राजनचा एकेकाळचा साथीदार असलेला रवी पुजारी अलिकडच्या काळात गुन्हेगारी कारवायांमध्ये कमालीचा सक्रिय झाला आहे. प्रसिद्ध सिने कलावंतांसह मुंबई, पुण्यातील बड्या बांधकाम व्यावसायिकांना खंडणीसाठी धमकावण्याचे सत्र त्याने अवलंबिल्यामुळे महाराष्ट्र पोलीस सतर्क झाले आहेत. पुजारीच्या वाढत्या कारवायांना पायाबंद घालण्यासाठी मुंबई, ठाणे आणि पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांची महत्त्वाची बैठक मुंबईत झाली.
अंधेरीतून गुन्हेगारी कारवायांना सुरुवात करणाऱ्या पुजारीला उत्कृष्ट इंग्रजी येते. तो मराठी, हिंदी, कन्नड आणि तेलगुही बोलतो. त्याने एका सराईत गुन्हेगाराचा मुंबईमध्ये खून केला तेव्हा छोटा राजनची नजर त्याच्यावर पडली. छोटा राजनने त्याला स्वत:च्या टोळीमध्ये सामील करुन घेतले. साधारणपणे १९९० च्या सुमारास त्याने दुबई गाठली. मुंबईमधील बडे बिल्डर आणि हॉटेल व्यावसायिकांकडून पुजारी खंडणी गोळा करायचा.
दाऊद इब्राहीम आणि छोटा राजन यांच्यात बेबनाव झाल्यावर तो राजन सोबत गेला. परंतु दाऊदच्या मुन्ना झिंगाडा या शूटरने बँकॉकमध्ये छोटा राजनवर हल्ला करत त्याच्यावर गोळ्या झाडल्या. त्यातून तो बचावला होता. परंतु त्याचे तीन साथीदार मारले गेले. तेव्हापासून पुजारी राजनपासून वेगळा झाल्याचे पोलीस अधिकारी सांगतात. सध्या आॅस्टे्रलियामध्ये राहून गुन्हेगारी कारवाया करीत असलेल्या पुजारीच्या टार्गेटवर कायमच दाऊद आणि छोटा शकील यांना मदत करणारे गुंड, बांधकाम व्यावसायिक आणि हॉटेल व्यावसायिक असल्याचेही पोलिसांचे म्हणणे आहे. पुजारीने सलमान खान, अक्षय कुमार, करन जोहर, राकेश रोशन यांना खंडणीसाठी धमकावले आहे. शाहरूख खान यांनीही रवी पुजारीने खंडणीसाठी धमकी दिल्याची तक्रार पोलिसांकडे दिली आहे.
मुंबई, ठाणे आणि पुण्यामध्ये रवी पुजारीच्या नावाने खंडणी मागितल्याचे गुन्हे दाखल होत आहेत. पुण्यामध्ये दोन वर्षांत पुजारीच्या नावाने खंडणी मागण्यात आल्याचे तीन- चार गुन्हे दाखल आहेत. पुजारीच्या वाढत्या गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासंदर्भात तसेच गुन्ह्याची पद्धती, दाखल झालेले गुन्हे याच्या संदर्भात मुंबईमध्ये बैठक झाली. आगामी काळात पुन्हा सक्रीय होऊ पाहणाऱ्या ‘अंडरवर्ल्ड’ला लगाम घालण्यासाठी पोलीस अधिक सक्रीय झाले आहेत. (प्रतिनिधी)