दोन पॅथॉलॉजी लॅबवर पोलिसांची कारवाई

By Admin | Updated: June 30, 2016 02:35 IST2016-06-30T02:34:22+5:302016-06-30T02:35:55+5:30

परवाना निलंबित असतानाही रक्त, लघवीची चाचणी करून अहवाल देणाऱ्या पॅथॉलॉजी लॅबवर कोपरखैरणे पोलिसांनी कारवाई केली

Police action on two pathology labs | दोन पॅथॉलॉजी लॅबवर पोलिसांची कारवाई

दोन पॅथॉलॉजी लॅबवर पोलिसांची कारवाई


नवी मुंबई : परवाना निलंबित असतानाही रक्त, लघवीची चाचणी करून अहवाल देणाऱ्या पॅथॉलॉजी लॅबवर कोपरखैरणे पोलिसांनी कारवाई केली आहे. दोन्ही लॅबमधून दिल्या जाणाऱ्या अहवालावर एकाच तज्ज्ञाची सही आढळली असून, प्रत्यक्षात मात्र ते तज्ज्ञ त्याठिकाणी उपस्थित नव्हते. महाराष्ट्र असोसिएशन आॅफ प्रॅक्टिसिंग पॅथॉलॉजिस्ट अँड मायक्रोलॉजिस्ट संघटनेच्या तक्रारीनुसार पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
ठरावीक काळासाठी परवाने निलंबित झालेल्या पॅथॉलॉजी लॅबमधून रक्त, लघवीच्या चाचणीचे अहवाल दिले जात होते. याची तक्रार महाराष्ट्र असोसिएशन आॅफ प्रॅक्टिसिंग पॅथॉलॉजिस्ट अँड मायक्रोलॉजिस्ट संघटनेने पोलिसांकडे केली होती. या तक्रारीनुसार कोपरखैरणे पोलिसांनी संघटनेच्या मदतीने कोपरखैरणे व घणसोलीतील दोन पॅथॉलॉजी लॅबवर कारवाई केली आहे. याकरिता वरिष्ठ निरीक्षक सतीश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक योगेश देशमुख यांच्या पथकाने संघटनेच्या मदतीने सापळा रचला होता. त्यामध्ये घणसोली सेक्टर ३ येथील संकल्प लॅब व कोपरखैरणे सेक्टर ५ मधील आयुष लॅबवर कारवाई करण्यात आली. तसेच सदर लॅबचे मालक सागर माळी व मेघा माळी तसेच संतोष खंबाळकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याशिवाय सायनचे पॅथॉलॉजिस्ट सूर्यनाथ त्रिपाठी यांच्याविरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. कारवाई केलेल्या दोन लॅबसह इतर काही लॅबमधून एकाच वेळी त्रिपाठी यांची सही असलेले अहवाल दिले जात असल्याचे संघटनेच्या निदर्शनास आले आहे. परंतु एखादा तज्ज्ञ एका वेळी अनेक ठिकाणी उपस्थित राहून अहवालावर सही करू शकत नाही. यावरून अहवालावर नियमबाह्य डिजिटल सह्या असल्यामुळे संघटनेने त्यांच्याविरोधात देखील तक्रार केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Police action on two pathology labs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.