‘पोलीस’ पाटीचा सर्रास गैरवापर
By Admin | Updated: May 21, 2016 03:49 IST2016-05-21T03:49:32+5:302016-05-21T03:49:32+5:30
पोलिसांनी आपल्या खाजगी दुचाकी किंवा चारचाकी वाहनांवर ‘पोलीस’ असा शब्द किंवा संबंधित कोणतेही चिन्ह लावायचे नाही,

‘पोलीस’ पाटीचा सर्रास गैरवापर
आकाश गायकवाड,
डोंबिवली- पोलिसांनी आपल्या खाजगी दुचाकी किंवा चारचाकी वाहनांवर ‘पोलीस’ असा शब्द किंवा संबंधित कोणतेही चिन्ह लावायचे नाही, असे परिपत्रक गृह खात्याकडून निघूनही त्याची अंमलबजावणी अद्याप कल्याण-डोंबिवलीत होताना दिसत नाही. पोलीस कर्मचारी, त्यांचे नातलगच नियम धाब्यावर बसवताना दिसत असून त्यावर कोणीही कारवाई करीत नाही.
पोलीस शब्द लिहिलेली पाटी, स्टिकर्स किंवा अन्य संबंधित चिन्हांचा गैरवापर सुरू असल्याने त्याचा वापर करू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र पोलीस कर्मचारी आणि त्यांचे नातलगच हा नियम सर्रास पायदळी तुडवत असल्याचे दिसून येते. असे चिन्ह आणि पोलीस नावाची पाटी असलेली अनेक वाहने सध्या दोन्ही शहरांत फिरताना दिसतात. त्यामुळे इतरांना कायदा शिकवणारे पोलीसच तो पायदळी तुडवत असल्याने कारवाई कोणी कोणावर करायची, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
अशी पाटी लावलेली असेल तर कोठेही सहज प्रवेश मिळतो. वाहतुकीचे नियम तोडले तर सहज सुटका होते. कारवाईत गाडी उचलली जात नाही आणि हेल्मेट-कागदपत्रे सोबत नसली तरी चालतात, अशा कारणांमुळे या पाट्या-चिन्हे लावली जातात, असे सांगितले जाते.
गोल स्टिकर, की-चेन पोलिसांच्या स्टेशनरी दुकानात सहज मिळत असल्याने त्याचा दुरु पयोग वाढला होता. त्यामुळे पोलीस अधिकारी-कर्मचारी त्यांच्या मालकीच्या किंवा खाजगी वाहनांवर पोलिसांचे चिन्ह आणि पोलीस शब्दाची पाटी लावण्यास प्रतिबंध करत असल्याचे परिपत्रकात म्हटले आहे. या सूचनांची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्याच्या सूचना राज्यातील सर्वच पोलीस विभागांना देण्यात आल्या आहेत. या सूचनांचे उल्लंघन कोणत्याही पोलीस कर्मचाऱ्याने किंवा अधिकाऱ्याने केले तर त्यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी, असे आदेश राज्यपालांच्या संमतीने देण्यात आले आहेत. मात्र, त्याची अंमलबजावणी न करणाऱ्या आणि आपल्याच माणसांवर कारवाई कशी करायची, अशा विवंचनेत असलेल्या पोलीसदादांवर कारवाई कोणी करायची, हाच यक्षप्रश्न आहे.
याबाबत, कल्याण वाहतूक शाखेचे सहायक पोलीस आयुक्त सयाजी डुबल यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.