हॉटेलमध्ये आढळला पोलंडच्या नागरिकाचा मृतदेह
By Admin | Updated: September 26, 2016 21:21 IST2016-09-26T21:21:58+5:302016-09-26T21:21:58+5:30
येरवड्यातील हॉटेल रॉयल आर्किडमध्ये एका विदेशी नागरिकाचा मृतदेह आढळून आला असून, हा नागरिक पोलंडचा आहे.

हॉटेलमध्ये आढळला पोलंडच्या नागरिकाचा मृतदेह
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 26 - येरवड्यातील हॉटेल रॉयल आर्किडमध्ये एका विदेशी नागरिकाचा मृतदेह आढळून आला असून, हा नागरिक पोलंडचा आहे. हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. मरियन बोकदान मायका (वय 56, रा. पोलंड) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे.
याप्रकरणी येरवडा पोलिसांनी अाकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. मायका काम करीत असलेल्या पोलंडच्या कंपनीची शाखा वाघोलीजवळील केसनंदमध्ये आहे. तेथील कर्मचा-यांना प्रशिक्षण देण्यासाठी मायका व त्याचे दोन सहकारी रविवारी पुण्यामध्ये आले होते. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर ते रामवाडी येथील रॉयल आर्किड हॉटेलमध्ये उतरले. तिघांनीही स्वतंत्र खोल्या घेतलेल्या होत्या.
रात्री जेवण झाल्यावर सर्वजण आपापल्या खोलीमध्ये गेले. सकाळी नोकराने दरवाजा ठोठावला तेव्हा आतमधून कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता. त्याने मास्टर कीच्या सहाय्याने दरवाजा उघडला तेव्हा बेशुद्धावस्थेत असलेल्या मायका यांना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले. तपासणीअंती डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांना झोपेतच हृदयविकाराचा झटका आल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून डॉक्टरांनी त्यांचा व्हिसेरा राखून ठेवला आहे.