एमएमसीबाबत पीएमओ गंभीर
By Admin | Updated: July 9, 2016 02:21 IST2016-07-09T02:21:37+5:302016-07-09T02:21:37+5:30
महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेवर (एमएमसी) रजिस्ट्रार म्हणून आयुर्वेदिक क्षेत्रातील डॉ. दिलीप वांगे यांची नियुक्ती करणे भाजपाच्याच अंगलट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

एमएमसीबाबत पीएमओ गंभीर
मुंबई : महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेवर (एमएमसी) रजिस्ट्रार म्हणून आयुर्वेदिक क्षेत्रातील डॉ. दिलीप वांगे यांची नियुक्ती करणे भाजपाच्याच अंगलट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महाराष्ट्र इंडियन मेडिकल असोसिएशनने पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रावरून या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून, राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री आणि आरोग्य सचिवांकडून या प्रकरणी स्पष्टीकरण मागण्यात आले आहे.
एमएमसीच्या कार्यकारिणीचा कार्यकाळ संपून महिना उलटूनही एमएमसीच्या निवडणुकांसाठी राज्य सरकार उदासीन होते, पण अचानकच २१ जून रोजी राज्य सरकारने एमएमसीच्या कार्यकारिणीला कोणतीही पूर्वकल्पना न देता, तिथे रजिस्ट्रारची नेमणूक केली होती. रजिस्ट्रारपदी नेमणूक करण्यात आलेली व्यक्ती ही आयुर्वेदिक डॉक्टर आहे. त्याचबरोबर, ते आयुर्वेद, युनानीच्या परिषदेवर रजिस्ट्रार म्हणूनही कार्यरत आहेत, तर डॉ. वांगे हे पोद्दार आयुर्वेद महाविद्यालयात सहायक प्राध्यापक म्हणूनही कार्यरत आहेत. त्यामुळे डॉ. वांगे एमएमसीत पूर्ण वेळ सेवा देऊ शकत नाहीत. शिवाय, ते आयुर्वेद क्षेत्रातील डॉक्टर आहेत. अॅलोपॅथीच्या परिषदेवर त्यांची नेमणूक केल्याने डॉक्टरांमध्ये नाराजीचा सूर होता.
क्रॉसपॅथीचा विषय सध्या गाजत असताना, राज्य सरकारकडून असे पाऊल का उचलण्यात आले? असा थेट सवाल डॉक्टरांनी उपस्थित केला. या विषयी ‘लोकमत’ने पहिल्यांदा वृत्त प्रसिद्ध केले होते. याबाबत राज्य सरकार उदासीन असल्यामुळे ‘आयएमए’ने पंतप्रधानांना पत्र लिहिले. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन आयएमएच्या पत्राला पंतप्रधान कार्यालयाने तातडीने उत्तर दिले आहे. त्यात वैद्यकीय शिक्षणमंत्री आणि आरोग्य सचिवांकडे या नियुक्तीचे स्पष्टीकरण मागितल्याचे नमूद करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
क्रॉसपॅथीचा विषय सध्या गाजत असताना, राज्य सरकारकडून असे पाऊल का उचलण्यात आले? असा थेट सवाल उपस्थित झाला, तेव्हा ‘लोकमत’ने प्रथम वृत्त प्रसिद्ध केले.