ब्रेकडाऊनला पीएमपीने लावला ब्रेक
By Admin | Updated: July 4, 2016 01:19 IST2016-07-04T01:19:09+5:302016-07-04T01:19:09+5:30
बसेसच्या देखभाल-दुरुस्तीसाठी विशेष उपाययोजना तसेच सुटे भाग वेळेत उपलब्ध होत असल्याने पीएमपीच्या मालकीच्या बसेसचे ब्रेकडाऊन पहिल्यांदाच ४ हजारांच्या खाली आले

ब्रेकडाऊनला पीएमपीने लावला ब्रेक
पुणे : पीएमपीच्या ताफ्यात असलेल्या बसेसच्या देखभाल-दुरुस्तीसाठी विशेष उपाययोजना तसेच सुटे भाग वेळेत उपलब्ध होत असल्याने पीएमपीच्या मालकीच्या बसेसचे ब्रेकडाऊन पहिल्यांदाच ४ हजारांच्या खाली आले आहे.
मागील वर्षी सप्टेंबर २०१५ मध्ये ५३६० वर गेलेला हा ब्रेकडाऊनचा आकडा जून २०१६ मध्ये ३८०० वर येऊन पोहोचला आहे. पुढील सहा महिन्यांत हा आकडा ३ हजारांवर आणण्याचे उद्दिष्ट पीएमपी प्रशासनाकडून निश्चित करण्यात आले आहे.
पीएमपीच्या मालकीच्या सुमारे १२०० बसेस आहेत. त्यातील ३०० बसेस बंद असून ८०० बसेस मार्गावर आहेत. या ८०० बसेसमधील सुमारे ५०० बसेस या सीएनजीवरील आहेत. या बसेस युरो ४ च्या बनावटीच्या असल्याने त्यामध्ये अत्याधुनिक यंत्रणा आहे. त्यामुळे एखादी बस बंद पडल्यास नेमकी कशामुळे बस बंद पडली आहे, हे समजण्यास मदत होते. त्यामुळे या बसच्या दुरुस्तीसाठी पीएमपीकडून विशेष काळजी घेण्यात येत आहे.
याशिवाय बसेससाठी चांगल्या गुणवत्तेचे सुटे साहित्यही वापरले जात असून या साहित्य खरेदीसाठी नियमितपणे निधीही उपलब्ध करून दिला जात आहे. याशिवाय ब्रेकडाऊनची जबाबदारी डेपोप्रमुखांवर निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या दहा महिन्यांपासून ब्रेकडाऊनच्या संख्येत लक्षणीय घट होतानाचे चित्र आहे.
ही घट अशीच काम ठेवण्यासाठी पीएमपीकडून मिशन ३ हजार ही मोहीम हाती घेण्यात आली असून त्याअनुषंगाने उपाययोजना हाती घेण्यात आल्याची माहिती पीएमपी प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
महिना ब्रेकडाऊन
सप्टेंबर (२०१५) ५३६०
आॅक्टोबर ५५०५
नोव्हेंबर ४५५७
डिसेंबर ४५८३
जानेवारी (२०१६) ४२४१
फेब्रुवारी४१७२
मार्च ४४०४
एप्रिल४३९२
मे४०२९
जून २०१६३८००