महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि महायुतीने मिळवलेल्या दैदीप्यमान यशाची दखल आता थेट दिल्लीतून घेण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विजयाबद्दल महाराष्ट्रातील जनतेचे मनापासून आभार मानले असून, हा विजय म्हणजे एनडीएच्या सुशासनावरील शिक्कामोर्तब असल्याचे म्हटले आहे. "महाराष्ट्रातील जनतेशी एनडीएचे नाते आता अधिक दृढ झाले आहे," अशा शब्दांत पंतप्रधानांनी राज्यातील मतदारांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली आहे.
विकासाच्या दृष्टीला जनतेचा कौल
महापालिकांच्या निकालांचे कल स्पष्ट झाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली भूमिका मांडली. ते म्हणाले की, "राज्यातील उत्साही जनतेने एनडीएच्या जनहितकारी आणि सुशासनाच्या अजेंड्याला आपले आशीर्वाद दिले आहेत. आमच्या कामगिरीचा अनुभव आणि विकासाची दृष्टी जनतेच्या मनाला भावली आहे, हेच या निकालातून दिसून येते. हा कौल केवळ राजकीय विजय नसून राज्याच्या प्रगतीला अधिक गती देणारा आणि आपल्या गौरवशाली संस्कृतीचा उत्सव साजरा करणारा आहे."
विरोधकांच्या खोट्या आरोपांना चोख प्रत्युत्तर
या यशात भाजप आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा मोठा वाटा असल्याचे सांगत पंतप्रधानांनी त्यांचे विशेष कौतुक केले. "महाराष्ट्रभर जनतेसोबत राहून अहोरात्र परिश्रम करणाऱ्या एनडीएच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा मला अभिमान आहे. त्यांनी आमच्या युतीच्या कामगिरीची माहिती लोकांपर्यंत पोहोचवली आणि त्याच वेळी विरोधकांच्या खोट्या आरोपांना प्रभावीपणे प्रत्युत्तर दिले," असे म्हणत मोदींनी कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवले आहे.
महाराष्ट्रात 'मोदी मॅजिक' कायम?
राज्यात नुकत्याच पार पडलेल्या २९ पैकी २५ महापालिकांमध्ये महायुतीने आघाडी घेतली आहे. मुंबईसह पुणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर सारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये भाजपने मुसंडी मारली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विजयाला 'महाविजय' म्हटले असतानाच, आता पंतप्रधान मोदींनीही या विजयावर आनंदाची मोहोर उमटवली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींची ही प्रतिक्रिया महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह भरणारी ठरणार आहे.
Web Summary : PM Modi acknowledged BJP and alliance's Maharashtra municipal election triumph. He thanked voters, affirming NDA's good governance. Modi emphasized the victory reflects public support for development and progress, boosting party morale for upcoming elections.
Web Summary : पीएम मोदी ने बीजेपी और गठबंधन की महाराष्ट्र नगरपालिका चुनाव जीत को सराहा। उन्होंने मतदाताओं को धन्यवाद दिया और एनडीए के सुशासन की पुष्टि की। मोदी ने जोर दिया कि जीत विकास के लिए सार्वजनिक समर्थन को दर्शाती है, आगामी चुनावों के लिए पार्टी का मनोबल बढ़ाती है।