बंदरांच्या विकासासाठी १ लाख कोटींची गुंतवणूक करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
By Admin | Updated: April 14, 2016 13:36 IST2016-04-14T13:32:54+5:302016-04-14T13:36:06+5:30
देशातील 7500 किमी लांबीच्या सागरी किना-याला विकासाचा मार्ग बनवण्याच्या हेतूने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बंदरांच्या विकासासाठी 1 लाख कोटींची गुंतवणूक करणार असल्याचं सांगितलं आहे

बंदरांच्या विकासासाठी १ लाख कोटींची गुंतवणूक करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. १४ - देशातील 7500 किमी लांबीच्या सागरी किना-याला विकासाचा मार्ग बनवण्याच्या हेतूने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बंदरांच्या विकासासाठी 1 लाख कोटींची गुंतवणूक करणार असल्याचं सांगितलं आहे. बंदरांच्या विकासाच्या माध्यमातून जागतिक बाजारपेठेला गुंतवणुसाठी मोदींनी निमंत्रणही दिलं आहे. 'मेरिटाइम इंडिया समिट 2016' च्या उद्घाटनावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते.
'सागरीमार्गे येऊन विकास करण्याची ही योग्य वेळ आहे. 2025 पर्यंत बंदरांची क्षमता वाढवण्याचे आमचे ध्येय आहे. बंदरांच्या विकासासाठी 1 लाख कोटींची गुंतवणूक आम्ही करणार आहोत', असं पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलले आहेत. 'व्यापार, आयात - निर्यात वाढवण्यासाठी अजून पाच बंदर तयार करण्याची योजना सरकार आखत आहे. याचा फायदा भारतीय अर्थव्यवस्थेला होईल', असा विश्वास मोदींनी व्यक्त केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुंतवणूकरदांना संधी न दवडण्याचं आवाहन केलं आहे. 'समुद्रमार्गे येण्यासाठी ही अत्यंच चांगली वेळ आहे. एकदा तुम्ही आलात की तुम्हाला सुरक्षा आणि समाधान मिळेल याची जबाबदारी मी स्वत: घेईन', अशी हमी मोदींनी गुंतवणूकदारांना दिली आहे. यावेळी मोदी यांनी 125व्या जयंतीनिमित्त बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करत आंबेडकर फक्त संविधानाचे शिल्पकार नाही आहेत तर देशाच्या पाणी, सिचंन आणि जलवाहतूक धोरणाचेही शिल्पकार आहेत असं म्हंटलं आहे.