भूखंड घोटाळ्याची चौकशी होणार
By Admin | Updated: July 1, 2016 01:59 IST2016-07-01T01:59:19+5:302016-07-01T01:59:19+5:30
पिंपरी-चिंचवड एमआयडीसीच्या जमीन खरेदी-विक्री प्रकरणात वाढलेली एजंटगिरी आणि अधिकाऱ्यांची मुजोरी थांबली पाहिजे

भूखंड घोटाळ्याची चौकशी होणार
पिंपरी : पिंपरी-चिंचवड एमआयडीसीच्या जमीन खरेदी-विक्री प्रकरणात वाढलेली एजंटगिरी आणि अधिकाऱ्यांची मुजोरी थांबली पाहिजे; त्यासाठी येथील भूखंड घोटाळ्याची शासनस्तरावर कसून चौकशी करून दोषींवर कारवाईचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
एमआयडीसीत अनागोंदी कारभार सुरू आहे. अशा चुकीच्या व्यवहारामुळे मोठा भूखंड घोटाळा केला असून, याबाबत योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी भाजपाचे शहर- सरचिटणीस अमोल थोरात यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आहेत.
‘‘एमआयडीसीच्या काही भूखंड विकसित करण्यासाठी महापालिकेकडे हस्तांतरित केले होते; मात्र यातील बहुतांश भूखंड विकसित केले नाहीत. तसेच सुविधा क्षेत्रासाठीच्या १५० एकर जमिनीवर ४०४ प्लॉट तयार करून, परस्पर अनधिकृतपणे विक्री केली आहे. काही अधिकाऱ्यांचा यात सहभाग असून, कोट्यवधी रुपयांचा हा भूखंड घोटाळा आहे. अनधिकृतपणे विक्री केलेले हे सर्व भूखंड परत ताब्यात घ्यावेत, चौकशी होऊन दोषींवर गुन्हे दाखल करावेत. १२०० हेक्टर जमिनीपैकी १० टक्के खुले क्षेत्र आणि ५ टक्के सुविधा क्षेत्रासाठी आरक्षित जागा आहे. सुविधा क्षेत्राच्या या ५ टक्के जागेवर विविध आरक्षणे आहेत. या सुविधा क्षेत्रासाठीच्या
दीडशे एकर जमिनीवर ४०४ प्लॉट तयार करून त्याची परस्पर अनधिकृतपणे विक्री केली आहे. एमआयडीसीच्या काही अधिकाऱ्यांचा यात सहभाग असून, कोट्यवधी रुपयांचा हा भूखंड घोटाळा आहे. एमआयडीसीतर्फे सुमारे दीडशे एकर भूखंड राखीव आहे. या भूखंडावर सुविधेकडे दुर्लक्ष केले. सुविधा क्षेत्रासाठी राखीव जमिनीचे ४०४ प्लॉट करून त्याची विल्हेवाट लावली आहे. (प्रतिनिधी)