कोरडवाहूला हेक्टरी २५ हजाराची मदत द्या

By Admin | Updated: December 8, 2014 00:56 IST2014-12-08T00:56:53+5:302014-12-08T00:56:53+5:30

दुष्काळ, कर्जमाफी आदी मुद्यांवरून नव्या सरकारला विधिमंडळात घेरण्यासाठी काँग्रेस सज्ज झाली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सोमवारी

Please give 25 thousand hectare of dryland | कोरडवाहूला हेक्टरी २५ हजाराची मदत द्या

कोरडवाहूला हेक्टरी २५ हजाराची मदत द्या

काँग्रेस सरकारला घेरणार
नागपूर : दुष्काळ, कर्जमाफी आदी मुद्यांवरून नव्या सरकारला विधिमंडळात घेरण्यासाठी काँग्रेस सज्ज झाली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सोमवारी काँग्रेसतर्फे विधानभवनावर ‘हल्लाबोल’ मोर्चा काढण्यात येणार आहे. संकटात सापडलेल्या शेतकऱ्याच्या मदतीसाठी कोरडवाहूला हेक्टरी २५ हजार रुपये व ओलितासाठी हेक्टरी ५० हजार रुपयांचे पॅकेज देण्याची मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केली.
ठाकरे म्हणाले, विदर्भ मराठवाडा दुष्काळाने होरपळून निघाला आहे. अपुऱ्या पावसामुळे सोयाबीनचे पीक हातून गेले. धानही करपले. कापसाचे उत्पादनही कमी झाले आहे. ऊसाला योग्य भाव मिळालेला नाही. बहुतांश गावांची आणेवारी चुकीची काढलेली आहे. शेतकरी संकटात असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मात्र मंत्रिमंडळ ठरविण्यात रममाण होते. आता ते केंद्राकडे ४५०० कोटींचे पॅकेज मागितल्याचे सांगत आहेत, पण राज्य सरकार म्हणून भूमिका जाहीर करीत नाही, अशी टीका ठाकरे यांनी केली. शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी कोरडवाहूसाठी हेक्टरी २५ हजार रुपये व ओलितासाठी हेक्टरी ५० हजार रुपयांचे पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी त्यांनी केली. विदर्भातील प्रश्नांना न्याय मिळण्यासाठी अधिवेशन एक महिना चालावे, अशी मागणीही त्यांनी केली. माजी मुख्यमंत्री ए.आर. अंतुले यांचे पार्थिव प्रदेश काँग्रेसच्या कार्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवावे, अशी विनंती त्यांच्या कुटुंबीयांना काँग्रेसतर्फे करण्यात आली होती, असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले. यावेळी गटनेते राधाकृष्ण विखे पाटील, उपनेते आ. विजय वडेट्टीवार,माजी खा. विलास मुत्तेमवार, माजी मंत्री नितीन राऊत, सतीश चतुर्वेदी, आ. सजंय दत्त, जिल्हाध्यक्ष सुनीता गावंडे, प्रदेश सचिव मुन्ना ओझा आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Please give 25 thousand hectare of dryland