प्लास्टिक, कागदी राष्ट्रध्वजाचा वापर थांबणार!
By Admin | Updated: January 3, 2015 00:54 IST2015-01-03T00:38:45+5:302015-01-03T00:54:24+5:30
शासनाचे जिल्हाधिका-यांना आदेश ; राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी तालुकास्तरावर समित्या.
प्लास्टिक, कागदी राष्ट्रध्वजाचा वापर थांबणार!
नितीन गव्हाळे/अकोला : राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासह प्लास्टिक व कागदी ध्वजाचा वापर थांबविण्यासाठी जिल्हा व तालुकास्तरावर समिती स्थापन करण्याचे आदेश राज्य शासनाच्या वतीने जिल्हाधिकार्यांना गुरुवारी देण्यात आले आहेत. जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी, तर तालुकास्तरावर तहसीलदार हे समितीचे प्रमुख असतील.
स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन आणि महाराष्ट्र दिनानिमित्ताने शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षक आणि सांस्कृतिक संस्था, संघटना प्लास्टिक व कागदी राष्ट्रध्वजाचा वापर करतात. परंतु कार्यक्रम संपल्यानंतर राष्ट्रध्वज शालेय परिसर, रस्त्यांवर, कार्यक्रमस्थळी पडलेले दिसून येतात. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. हे प्रकार रोखण्याचे काम या समित्या करतील. जिल्हाधिकारी व तहसीलदार हे सामाजिक संघटना, संस्थांचे पदाधिकारी, शैक्षणिक संस्था, शासकीय, निमशासकीय कार्यालयांतील अधिकारी व कर्मचार्यांना सोबत घेवून जनजागृती करणार आहेत.
. *जिल्हाधिकारी, तहसीलदारांकडे राष्ट्रध्वज द्यावेत
राष्ट्रध्वजाचा अवमान टाळण्यासाठी विद्यार्थी, शिक्षक, नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी रस्त्यात, परिसरात आढळून आलेले राष्ट्रध्वज जिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्याकडे सुपूर्द करावेत आणि कुणी राष्ट्रध्वजाची अवमानना होत असेल तर त्याची सूचनासुद्धा त्यांना द्यावी, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.