- विजय चोरडियाजिंतूर (परभणी) - छत्रपती संभाजीनगर येथे २६ एप्रिल १९९३ रोजी झालेल्या विमान अपघातामधून दैव बलवत्तर म्हणून येथील माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर व तत्कालीन नगराध्यक्ष वसंतराव शिंदे हे बालंबाल बचावले होते. नेमका अपघात कसा झाला व आम्ही त्यातून कसे वाचलो, याचा थरारक अनुभव शिंदे यांनी गुरुवारी ‘लोकमत’शी बोलताना कथन केला.
तत्कालीन आमदार रामप्रसाद बोर्डीकर हे तेव्हा कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबईचे सभापती व मी नगराध्यक्ष होतो. २७ एप्रिल १९९३ रोजी त्यावेळचे कृषिमंत्री शरद पवार यांचा मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत कार्यक्रम होता. त्यासाठी आम्ही दोघे मुंबईला जाण्यासाठी औरंगाबाद विमानतळावर आलो. जयपूर-मुंबई-जयपूर हे कनेक्टिंग विमान तब्बल एक ते दीड तास लेट होते. आम्हाला विमानाचे तिकीट पण मिळाले नव्हते. मात्र, परभणी येथील एका कुटुंबाने ऐनवेळी मुंबईला येणे रद्द केल्याने आम्हाला विमानात बसता आले. ज्यावेळी विमान उड्डाण करत होते त्यावेळेस रनवेवर जेवढी गती हवी तेवढी विमानाने घेतली नाही, त्यामुळे टेक ऑफनंतर विमान हेलकावे खात होते. काही सेकंदात विमानामध्ये काळा धूर पसरला आणि कॉकपीटचा एक तुकडा खाली पडला. धुरात काय करावे समजत नसतानाच काही सेकंदातच दुसरा तुकडा पडला. आम्ही समोरच्या बाजूला होतो दोघांनीही सीटबेल्ट बांधले नव्हते. त्यामुळे कसलाही विचार न करता सरळ विमानातून उड्या (पॅराशूटशिवाय) मारल्या. साधारणपणे ४० ते ५० फूट उंचीवरून आमच्या उड्या असाव्यात. खाली जमिनीवर पडल्यानंतर आम्ही बेशुद्ध अवस्थेत होतो. आम्हाला मृत्यू समोर दिसत असताना आमच्या सोबत विमानात असणाऱ्या ५५ प्रवाशांचा जळून मृत्यू झाला होता. केवळ दैव बलवत्तर म्हणूनच आमचा जीव वाचला. आजही आम्ही पुनर्जन्म अनुभवत आहोत. जगभरात कुठेही विमान दुर्घटना घडली तर या प्रसंगाला उजाळा मिळतो व अंगावर शहारे येतात.
तुळजाभवानीचा आशीर्वाद व जनतेच्या प्रेमामुळे त्यावेळेस बाबाला पुनर्जन्म मिळाला. - मेघना साकोरे बोर्डीकर, राज्यमंत्री रामप्रसाद बोर्डीकर यांच्या कन्या