पोलिसांच्या सुटीसाठी आता ‘वर्षभराचा प्लॅन’
By Admin | Updated: May 14, 2015 23:54 IST2015-05-14T22:54:40+5:302015-05-14T23:54:37+5:30
तीस दिवस हक्काची रजा : नियोजन करण्याचे पोलीस अधीक्षकांचे आदेश

पोलिसांच्या सुटीसाठी आता ‘वर्षभराचा प्लॅन’
सातारा : प्रत्येक कर्मचाऱ्याला हक्काची रजा मिळालीच पाहिजे, यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी आग्रही भूमिका घेतली आहे. त्याचाच एक भाग म्हणून कोणत्या कर्मचाऱ्याला कोणत्या महिन्यात रजेवर सोडणार, याचा वषार्चा आढावाच सादर करण्याचे आदेश त्यांनी सर्व प्रभारी अधिकाऱ्यांना दिले आहेत. ही प्रक्रिया वेगात सुरू असल्याने रजा, सुट्ट्यांची चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या पोलिसांना दिलासा मिळाला आहे. पोलीस अधीक्षकांच्या या निर्णयाने जुलमाने मिळणाऱ्या सुट्या पोलिसांना यंदा हक्काने मिळणार आहेत. यापूर्वी हक्काची रजा, अर्जित रजा मंजूर करण्यासाठी पोलीस अधीक्षकांकडे अर्ज करण्याची पद्धत होती. पोलीस ठाण्यापासून पोलीस मुख्यालयापर्यंतच्या या अर्जाच्या प्रवासात अनेकदा वेळ लागायचा. त्यामुळे आवश्यक त्यावेळी पोलिसांना
रजा मिळत नव्हती. रजा मंजूर झाली नाही, अशीच उत्तरे यायची आणि अधीक्षकांना विचारायला जाणार कोण, असा प्रश्न असायचा. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी पदभार स्वीकारल्यानंतर मागील सप्टेंबरमध्ये सर्व कर्मचाऱ्यांना हक्काची व अर्जित रजा देण्याचे निर्देश डॉ. देशमुख यांनी दिले होते. तरीही अनेक प्रभारी अधिकाऱ्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना पुरेशा रजा दिल्या नाहीत.
ही गोष्ट निर्दशनास आल्यामुळे डॉ. देशमुख यांनी यंदा सर्व प्रभारी अधिकऱ्यांना कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्यांची यादीच तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. १५ दिवस हक्क व १५ दिवस अर्जित रजा याप्रमाणे तत्काळ प्लॅन तयार करायला सांगितला आहे. दर दिवशी दहा टक्के कर्मचारी रजेवर सोडायचे, यानुसार हे नियोजन केले जात आहेत. त्यामुळे नेहमी रजा नाकारणारे प्रभारी अधिकारी आता कर्मचाऱ्यांना तुला कधी रजा पाहिजे, असे विचारायला लागले आहेत. सुट्यांचे प्लॅनिंग करण्याची संधी मिळाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. (प्रतिनिधी)
पोलिसांच्या रजांची सद्य:स्थिती अशी...
सर्वसामान्यांच्या सणाचा दिवस तो पोलिसांच्या कडक ड्युटीचा
दहा दिवसांची रजा मागितली, तर पाच किंवा चार दिवसांची मिळते
मागेल तेवढी हक्काची रजा संपूर्ण नोकरीच्या कालावधीत क्वचितच मिळत असेल
कोणतेही महत्त्वाचे काम असेल, तर आजारी पडण्याशिवाय पर्यायच नसतो
हक्काच्या सुट्या शिल्लक असतानाही करावी लागतात आजारपणाची सोंगे
साप्ताहिक सुटीच्या आदल्या दिवशी नाइट कंपल्सरी; त्यामुळे ती सुटी उपयोगशून्यच
आता हक्काने रजेवर जा : डॉ. देशमुख
एकाच आदेशाने जिल्ह्यातील सर्व पोलीस कर्मचाऱ्यांच्या हक्क रजा मंजूर केल्या आहेत. तरीही काही प्रभारी अधिकारी कर्मचाऱ्यांना सुटीवर सोडत नाहीत. त्यामुळे निवडणुका, गणेशोत्सव व नवरात्रीचे बंदोबस्त विचारात घेऊन दर दिवशी दहा टक्के कर्मचाऱ्यांना रजेवर पाठविण्याचे नियोजन करण्यास सांगितले आहे. त्यातून सुटीवर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची यादी पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे येणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना हक्काने रजेवर जाता येईल, असे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सांगितले.