अल्पसंख्याकांसाठी आराखडा आखा
By Admin | Updated: August 1, 2016 04:43 IST2016-08-01T04:43:59+5:302016-08-01T04:43:59+5:30
अल्पसंख्याक समाजातील युवक-युवतींनाही व्हावा यासाठी निश्चित आराखडा तयार करण्याची सूचना प्रत्येक विभागाला देण्यात आली

अल्पसंख्याकांसाठी आराखडा आखा
मुंबई : राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ अल्पसंख्याक समाजातील युवक-युवतींनाही व्हावा यासाठी निश्चित आराखडा तयार करण्याची सूचना प्रत्येक विभागाला देण्यात आली आहे. अल्पसंख्याकांसाठी दरवर्षी किमान एक प्रकल्प सुरू करण्यात यावा, असा शासन निर्णयाद्वारे देण्यात आला आहे.
अल्पसंख्याक समाजातील युवक-युवतींच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक विकासासंदर्भात अलीकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विविध विभागांच्या प्रमुखांची बैठक झाली. यात अल्पसंख्यात समाजातील युवांना प्रगतीच्या मुख्य प्रवाहात आणण्याबाबत चर्चा झाली. विविध विभागांकडून दिल्या जाणाऱ्या सोई सवलती आणि योजनांची माहिती अल्पसंख्य समाजापर्यंत पोहचावी यासाठी सूचना देण्यात आल्या. या बैठकीच्या अनुषंगाने अल्पसंख्यांक विभागाकडून शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
या शासन निर्णयानुसार, अल्पसंख्यांक समाजापर्यंत सरकारी योजनांचा लाभ पोहचावा यासाठी निश्चित आराखडा तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व विभागांनी शक्य असेल तेथे आपल्या मंजूर निधीमधील १५ टक्के निधी अल्पसंख्यांकासाठीच्या योजनांसाठी राखून ठेवावा. तसेच दरवर्षी अल्पसंख्यांकांसाठी किमान एक प्रकल्प कार्यान्वित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यासाठी सर्व विभागांशी समन्वय साधण्याची जबाबदारी अल्पसंख्याक विकास विभागाकडे सोपविण्यात आली आहे. या प्रकल्पांच्या सद्यस्थितीचा आढावा घेऊन त्यांच तिमाही अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्याच्या सूचनाही विभागाला देण्यात आल्या आहेत.
अल्पसंख्याक समाजातील युवांपर्यंत विकास पोहचवून त्यांच्यात विश्वासाचे वातावरण निर्माण होणे आवश्यक आहे. त्यासाठी अल्पसंख्यांक विकास विभागासह शालेय शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षण, नगर विकास, कौशल्य विकास, महिला व बाल कल्याण विकास, सार्वजनिक आरोग्य आणि सामाजिक न्याय विभागासाठी मार्गदर्शक सूचनाही या शासन निर्णयाद्वारे देण्यात आल्या आहेत. अल्पसंख्याक विद्याथ्यांचे शाळेतील गळतीचे प्रमाण मोठे आहे. हे प्रमाण शुन्यावर आणण्यासाठी अल्पसंख्याक बहुल ४ जिल्ह्यांत पायलट प्रोजेक्ट ेराबविण्यापासून शासकीय सेवेतील अल्पसंख्याक समाजाचा टक्का वाढविण्यासाठी मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या.
>कामांची माहिती द्या!
अधिकाऱ्यांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात याव्यात. यात सच्चर समिती, कुंडू समिती, मेहमुद्दूर समिती, टाटा सामाजिक विज्ञान संस्था आदी संशोधन प्रकल्प आणि त्या अनुषंगाने करण्यात आलेल्या कामांची माहिती देण्याची सूचना करण्यात आली आहे.