चौपदरीकरणाचा आराखडा आघाडी सरकारचाच
By Admin | Updated: June 1, 2015 00:17 IST2015-05-31T23:34:01+5:302015-06-01T00:17:12+5:30
अतुल काळसेकर : आमदार नीतेश राणे यांच्यावर केली टीका

चौपदरीकरणाचा आराखडा आघाडी सरकारचाच
कणकवली : माजी पालकमंत्री नारायण राणे यांनी प्रकल्प राबवण्यासाठी वेळप्रसंगी विरोधकांना हद्दपार करण्याची भाषा केली. त्यांचेच सुपुत्र आमदार नीतेश राणे हे चौपदरीकरणाच्या विकास प्रकल्पाला विरोध करत आहेत. चौपदरीकरणाचा आराखडा कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळातच बनला आहे, असे प्रतिपादन भाजपाचे जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी येथील पत्रकार परिषदेत केली. यावेळी तालुकाध्यक्ष शिशीर परूळेकर उपस्थित होते.
काळसेकर म्हणाले की, आमदार नीतेश राणे ज्या आराखड्याच्या विरोधात बोलत आहेत आणि त्याविरोधात ग्रामस्थांना भडकावत आहेत, तो चौपदरीकरणाचा आराखडा हा कॉँग्रेसच्या सत्ताकाळातच बनला आहे. २०१० साली महामार्गाचा आराखडा बनविण्यास सुरूवात झाली. त्यावेळी कॉँग्रेस-राष्ट्रवादीचे आघाडी सरकार होते. तसेच नारायण राणे जिल्ह्याचे पालकमंत्री होते. २०११ साली केंद्रात कॉँग्रेस सरकार असताना हा आराखडा मंजूर झाला. आमदार राणेंची सध्याची आंदोलनाची भूमिका म्हणजे ‘मांजर मारून काशीला जाऊन पाप धुवून येण्यासारखी’ आहे, अशी टीका काळसेकर यांनी यावेळी व्यक्त केली.
नीतेश राणे यांचे वक्तव्य पूर्णत: चुकीचे व अभ्यासहीन आहे. गौण खनिज बंदीचा मोर्चा असतो की रेल रोको आंदोलन असो राणे कुटुंबीयांना सत्तेत असताना व विरोधी पक्षात असताना जनतेचे प्रश्न आंदोलन करून कसे सोडवायचे हे समजलेच नाही, असे ते म्हणाले.
कॉँग्रेसच्या सत्ताकाळात बनलेल्या आराखड्यात बदल करण्याचे अधिकारी केंद्राचे आहेत. लोकांना भावना भडकावण्यासाठी प्रांताधिकाऱ्यांसमवेत बैठका घेऊन प्रश्न सुटणार नाही. कणकवली, कुडाळ तालुक्यात भाजपा पदाधिकारी ग्रामस्थांच्या भेटीगाठी घेत आहेत. ग्रामस्थांकडून हरकती घेऊन आराखड्यात आवश्यक ते बदल करण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही काळसेकर यांनी यावेळी बोलताना सांगितले.
नारायण राणे यांनी विकासाला विरोध करू नका, अशी भूमिका घेतली. आमदार नीतेश राणेंना ही भूमिका मान्य नाही का? चौपदरीकरणाविरोधात आंदोलन करणाऱ्या जनतेने हा आराखडा कोणाची हॉटेल्स, संस्था भवने वाचवण्यासाठी करण्यात आला आहे, हे लक्षात घ्यावे. (प्रतिनिधी)
कॉँग्रेसने केलेल्या या आराखड्यात बदल सुचवायचे असतील, तर ते केंद्रशासनाकडे सुचवावे लागतील. यासाठी या प्रश्नाचा योग्य पद्धतीने पाठपुरावा करणारे माजी आमदार प्रमोद जठार यांच्या नेतृत्वाखाली ३ जून रोजी सह्याद्री अतिथीगृहात संबंधित अधिकारी व भाजपा पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
चौपदरीकरणाच्यासंदर्भात प्रकल्पग्रस्तांच्या ज्या सूचना, हरकती असतील, त्यांनी त्या २ जूनपर्यंत द्यायच्या आहेत, असे आवाहन अतुल काळसेकर यांनी केले आहे.
नीतेश यांच्याकडून ग्रामस्थांना भडकावण्याचे काम.
२०१०सालीच महामार्गाचा आराखडा बनवण्याचे काम होते सुरू; काळसेकर.