‘पीके’चा खास ‘शो’ अडचणीत
By Admin | Updated: November 10, 2014 04:01 IST2014-11-10T04:01:06+5:302014-11-10T04:01:06+5:30
संजय दत्तच्या मैत्रीखातर येरवडा कारागृहात ‘पीके’चा खास शो आयोजित करण्याच्या प्रयत्नाला राज्याच्या कारागृह महानिरीक्षक मीरा बोरवणकर यांनी चांगलाच खो दिला आहे

‘पीके’चा खास ‘शो’ अडचणीत
पुणे : संजय दत्तच्या मैत्रीखातर येरवडा कारागृहात ‘पीके’चा खास शो आयोजित करण्याच्या प्रयत्नाला राज्याच्या कारागृह महानिरीक्षक मीरा बोरवणकर यांनी चांगलाच खो दिला आहे.
कारागृहात चित्रपटाचा शो करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे वक्तव्य आमीरने रविवारी दुपारी नोएडामध्ये (उत्तर प्रदेश) केले. त्यावर येथे कोणीही स्पेशल नाही, सगळे कैदी सारखेच आहेत, अशा शब्दांत मीरा बोरवणकर यांनी खडसावल्यामुळे आमीरला चांगलाच झटका बसला आहे.
‘पीके’ या चित्रपटात आमीरची मुख्य भूमिका असून, संजय दत्तने त्याच्या मित्राची भूमिका केली आहे. पडद्यावरील ही मैत्री प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आमीर प्रयत्न करीत आहे. संजयसोबतचा त्याचा हा पहिलाच चित्रपट आहे. मुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी संजय दत्त सध्या येरवडा कारागृहात शिक्षा भोगत आहे. त्यामुळे आपण संजय दत्तसाठी खास ‘स्क्रिनिंग’ करण्याच्या प्रयत्नात असल्याचे त्याने स्पष्ट केले होते.
संजय दत्तसोबत काम करताना सुरक्षिततेची आणि निवांतपणाची भावना होती. तो आपल्याला मोठ्या भावासारखा आहे. सेटवर घालविलेला वेळ खूपच छान होता. त्याच्यातील माणुसकी आणि प्रेमभावाबद्दल आदर आहे. त्याच्यासोबत काम करण्याचा अनुभव संस्मरणीय होता, असेही आमीर म्हणाला होता. यासंदर्भात बोरवणकर यांची प्रतिक्रिया विचारली असता, आमच्यासाठी कोणीही विशेष व्यक्ती नाही. सगळे कैदी एकसमान आहेत. कोणालाही आम्ही खास वागणूक देत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आगामी काळात आमीरच्या प्रयत्नांना कितपत यश मिळते, तसेच संजय दत्तसाठी विशेष ‘शो’चे आयोजन केले जाते का, याकडे लक्ष लागून राहणार आहे. (प्रतिनिधी)