चेंबूरमध्ये पाइपलाइन फुटली
By Admin | Updated: September 23, 2014 05:23 IST2014-09-23T05:23:29+5:302014-09-23T05:23:29+5:30
२० ते २५ वर्षे जुनी असलेली तानसा पाइपलाइन आज चेंबूरच्या टिळकनगर परिसरात फुटली.

चेंबूरमध्ये पाइपलाइन फुटली
मुंबई : २० ते २५ वर्षे जुनी असलेली तानसा पाइपलाइन आज चेंबूरच्या टिळकनगर परिसरात फुटली. त्यामुळे दिवसभरात हजारो लीटर पाणी वाया गेले असून, सायंकाळपर्यंत पालिकेकडून या पाइपलाइनच्या दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरू होते.
सायन आणि कुर्ला परिसराला पाणीपुरवठा करणारी ही ४३ इंचाची तानसा पाइपलाइन सोमवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास चेंबूरच्या टिळकनगर परिसरात फुटली. एमएमआरडीएमार्फत नुकत्याच सुरू करण्यात आलेल्या चेंबूर-सांताक्रूझ लिंक रोडच्या उड्डाणपुलाखालून ही पाइपलाइन जात असून, सकाळपासून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले.
येथील स्थानिक रहिवाशांनी पहाटेच या घटनेबाबत पालिकेला माहिती दिली. त्यानुसार सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पालिका कर्मचारी आणि अधिकारी या ठिकाणी पोहोचले. त्यांनी तत्काळ घाटकोपर परिसरातून पाइपलाइनेचे वॉल बंद करून पाणीपुरवठा बंद केला. मात्र दोन तासांत या ठिकाणी हजारो लीटर पाणी वाया गेले होते. त्यामुळे हा परिसर जलमय झाला होता. शिवाय आज दिवसभर सायन आणि कुर्ला परिसरात पाणी न आल्याने लोकांची मात्र पाण्यासाठी धावपळ सुरू होती. (प्रतिनिधी)