मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वीच ‘पिपली लाइव्ह’!
By Admin | Updated: September 4, 2015 00:59 IST2015-09-04T00:59:57+5:302015-09-04T00:59:57+5:30
मुख्यमंत्री आपल्या गावात येणार... या खबरीनेच दुष्काळदेशी जीवन कंठणाऱ्यांचे डोळे चमकले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त गावांची पाहणी करणार आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वीच ‘पिपली लाइव्ह’!
विनोद गोळे पारनेर (जि.अ.नगर)
मुख्यमंत्री आपल्या गावात येणार... या खबरीनेच दुष्काळदेशी जीवन कंठणाऱ्यांचे डोळे चमकले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त गावांची पाहणी करणार आहेत. एकीकडे मुख्यमंत्री ज्या मार्गावरून येणार तेथील दगड-धोंडे हटविण्याची लगबग प्रशासनाकडून सुरू आहे; तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांना काय दाखवायचे आणि काय नाही, याच्या तयारीत गावपुढारी आणि अधिकारी गुंतले आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे गावकऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्याचे दिसून आले. एकूणच ‘पिपली लाइव्ह’ या चित्रपटातील कथेची आठवण मुख्यमंत्री दौऱ्याच्या पूर्वसंध्येने करून दिली आहे.
पारनेर तालुक्यातील पिंप्रीपठार, पाथर्डी तालुक्यातील ढवळेवाडी व सातवळ, जामखेड तालुक्यातील काटेवाडी व राजुरी या गावांनामुख्यमंत्री भेट देतील. पिंप्रीपठार गावात मुख्यमंत्री येणार म्हणून प्रशासनाची अचानक धावपळ उडाली होती. बैठका सुरू होत्या. सूचना दिल्या जात होत्या. रस्त्यावरील खड्डे बुजविणे, काट्याची झाडे काढण्याच्या कामाला कधी नव्हे तो वेग आला होता. कान्हूरपठारजवळील पिंपळगाव-रोठा रस्त्यावर हेलिपॅड बनविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. काही अधिकारी गावात सकाळपासूनच तळ ठोकून होते.