पिंपरी-चिंचवड होणार ‘स्मार्ट’

By Admin | Updated: September 20, 2016 02:03 IST2016-09-20T02:03:32+5:302016-09-20T02:03:32+5:30

महापालिकेचा समावेश ‘स्मार्ट सिटी’त झाला नसला, तरी अमेरिकेतील ओरॅकल कंपनी शहराला स्मार्ट बनविण्यासाठी पुढे सरसावली आहे.

Pimpri-Chinchwad will become 'smart' | पिंपरी-चिंचवड होणार ‘स्मार्ट’

पिंपरी-चिंचवड होणार ‘स्मार्ट’


पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेचा समावेश ‘स्मार्ट सिटी’त झाला नसला, तरी अमेरिकेतील ओरॅकल कंपनी शहराला स्मार्ट बनविण्यासाठी पुढे सरसावली आहे. अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली आहे.
ओरॅकल या कंपनीशी महाराष्ट्र सरकारचा सामंजस्य करार झाला आहे. या करारात स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत जे काही प्रकल्प येतात ते राबविण्यासाठी आर्थिक मदत आणि अंमलबजावणीसाठी सहकार्य करण्याची भूमिका ओरॅकल कंपनीची असेल. यामध्ये पिंपरी-चिंचवडबरोबरच मीरा-भार्इंदर महापालिका, कल्याण-डोंबिवली महापालिकांचाही समावेश करण्यात आला आहे.
शहरांना स्मार्ट बनविण्यासाठी केंद्र सरकारने मागील वर्षी राबविलेल्या स्मार्ट सिटी योजनेत सुरुवातीला देशभरातील १०० शहरांचा समावेश केला. मात्र, पिंपरी-चिंचवड शहराला चांगले गुण असतानाही योजनेतून शहराला वगळण्यात आले. पिंपरी-चिंचवड शहर सर्व निकषांमध्ये बसत असतानाही शहराचा या योजनेत समावेश करण्यात न आल्याने पिंपरी-चिंचवडवर अन्याय झाल्याच्या भावना शहरवासीयांनी व्यक्त केल्या. याबाबत सामाजिक संघटनांनी आंदोलनही केले. पिंपरी-चिंचवडचा ‘स्मार्ट सिटी’ योजनेत समावेश व्हावा यासाठी विविध पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी केंद्रीय मंत्र्यांच्या भेटीही घेतल्या. त्यावेळी पुढील टप्प्यात शहराचा समावेश होईल, अशी आश्वासने देण्यात आली. मात्र, अद्यापही समावेश झालेला नाही.
शहराच्या विकासाला गती...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या अमेरिका दौऱ्यावर असून, तेथील ओरॅकल कंपनीशी सामंजस्य करार करण्यात आला आहे. यामध्ये स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत जे काही प्रकल्प येतात ते राबविण्यासाठी आर्थिक मदत आणि अंमलबजावणीसाठी ओरॅकल कंपनी सहकार्य करणार आहे. त्यामुळे शहराचा केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेत समावेश झाला नसला, तरी ओरॅकल कंपनीच्या माध्यमातून का होईना शहरात विविध योजना राबविल्या जातील. यामुळे शहराचा विकास साधण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)
>मुख्यमंत्री : परदेशातून घोषणा

Web Title: Pimpri-Chinchwad will become 'smart'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.