पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महिला अधिका-याला दमबाजी आणि मारहाण
By Admin | Updated: May 23, 2017 21:33 IST2017-05-23T21:33:23+5:302017-05-23T21:33:23+5:30
संत तुकारामनगर येथील महापालिकेच्या करसंकलन कार्यालयातील महिला प्रशासन अधिकाºयाला एका शिपायाने शिवीगाळ करून दमबाजी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महिला अधिका-याला दमबाजी आणि मारहाण
ऑनलाइन लोकमत
पिंपरी, दि. 23 - संत तुकारामनगर येथील महापालिकेच्या करसंकलन कार्यालयातील महिला प्रशासन अधिकाºयाला एका शिपायाने शिवीगाळ करून दमबाजी, धक्काबुक्की, शिवीगाळ करण्याचा प्रकार आज घडला. मात्र, तक्रार द्यायला गेलेल्या महिलेला राजकीय नेत्याने फोन करून राजकीय दबाव टाकल्याने तक्रार दाखल झाली नाही. याबाबत महापालिका सूत्रांनी दुजोरा दिला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे संत तुकारामनगर येथे करसंकलन विभागाचे कार्यालय आहे. त्या ठिकाणी कामावर असलेल्या महिला प्रशासन अधिकाºयाने सकाळी अकराच्या सुमारास एका शिपायाला कामाविषयी विचारणा केली. ‘काल सांगितलेले काम केले नाही, अशी विचारणा करून झापले. त्यामुळे चिडलेल्या शिपाई आणि महिला अधिकाºयामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. त्या शिपायाने अर्वाच्य शिवीगाळ केली. अंगावर धावून गेला. हा प्रकार पाहून कार्यालयातील अन्य सहकारी दाखल झाले त्यावेळीही संबंधित शिपाई महिला अधिका-याच्या अंगावर धावून जात होता. धक्काबुक्कीही करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संबंधित अधिकारी दमबाजी आणि धक्काबुकीची तक्रार करण्यासाठी महापालिका भवनात दाखल झाली. प्रशासन आणि कर संकलन विभागाच्या अधिका-यांच्या दालनात जाण्यापूर्वीच त्यांना कोणाचा तरी दूरध्वनी आला आणि ती महिला तक्रार न करताच कार्यालयात परतली.
याबाबत पोलिस किंवा महापालिकेत कोणतीही तक्रार दाखल झालेली नसल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. याबाबत करसंकलन विभागाचे सह आयुक्त दिलीप गावडे यांना विचारले असता, ‘‘संबधित ठिकाणी घडलेला प्रकार हा किरकोळ होता. तो सामंजस्याने मिटला आहे.’’
गाववाल्या कर्मचा-यांची मुजोरी-
राजकीय वरदहस्त असणारे शिपाई महापालिकेत मोठ्याप्रमाणावर आहेत. हे शिपाई अनेक राजकारण्याचे खबरे बनले आहेत. त्यामुळे काम न करताही राजकीय वरदहस्तामुळे ते कोणालाही जुमानत नाहीत. त्यामुळे वरिष्ठांचा आदेश ऐकण्यापेक्षा दुरूत्तरे करण्यावर भर देतात. त्यातच हे लोक नेत्यांशी संबधित असल्याने त्यांच्यावर कारवाई करणार कोण?