जुन्नर : जुन्नरजवळील पिंपळगाव सिद्धनाथ येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याला बाहेर काढण्यास वनविभागाला यश आले आहे. कारवीच्या लाकडाच्या केलेल्या तराफ्यामुळे त्याला जीवदान मिळाले.त्या बिबट्याची रवानगी माणिकडोह येथील बिबट्या निवारा केंद्रात करण्यात आली. रात्रीच्या वेळी येथील किसन ज्ञानेश्वर खंडागळे यांच्या शेतातील विहिरीत बिबट्या पडला. मात्र, रात्रभर पाण्यात पोहून पोहून त्याची दमछाक झाली. मोटारच्या पाइपच्या आधार घेत त्याने विहिरीत रात्र काढली. शेतकरी खंडागळे हे सकाळी साडेनऊच्या सुमारास विहिरीवर गेले तेव्हा त्यांना बिबट्या दिसला. त्यांनी याबाबत जुन्नर वनविभागाला कळवले. माणिकडोहच्या बिबट्या निवारा केंद्राचे डॉ. अजय देशमुख यांच्या रेस्क्यू टीमसह वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मात्र, विहिरीत पिंजरा सोडून त्याला वाचविण्यास वेळ लागणार असल्याने मधल्या वेळात बिबट्याला आधार देण्यासाठी टॉमेटोची रोपे बांधण्यासाठी शेतकरी वापरत असलेल्या कारवीच्या काठ्यांचा तराफा सोडण्यात आला. तराफ्यावर बिबट्या बसून राहिला. त्यानंतर वजनाने हलका असलेला पिंजरा विहिरीत सोडून बिबट्याची सुटका करण्यात आली.वाचविलेला हा बिबट्या ३ वर्षांचा असून, ती मादी असल्याचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अजय देखमुख यांनी सांगितले. (वार्ताहर)
पिंपळगावला बिबट्याला जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2016 01:50 IST