लोककलावंताची फिनिक्स भरारी!
By Admin | Updated: July 14, 2014 23:57 IST2014-07-14T23:57:23+5:302014-07-14T23:57:23+5:30
अनोखी झुंज : मनगटाने हार्मोनियम वादन

लोककलावंताची फिनिक्स भरारी!
वाशिम: त्यांचे बलदंड हात महारोगाने एकाकी दुबळे झाले. झाडाची पाने गळावीत तसे हाता, पायांची बोटं गळून गेली. घरात अठराविश्वे दारिद्रय़; मात्र त्यांच्या ध्येयकोषात दु:ख, निराशा हे शब्दच नाहीत. लहानपणापासूनच संगीताचा छंद होता. आज त्यांचं अवघं जीवनच संगीताने व्यापून टाकलं आहे. त्यांच्या दोन्ही हाताला एकही बोट नाही; मात्र मनगटाच्या सहाय्याने हार्मोनियम वाजवून इतरांच्या जीवनात आशावाद पेरणारे लोककलावंत मोतीराम पट्टेबहादूर कमालीचे आशावादी असून, त्यांचे व्यक्तिमत्त्व इतरांसाठी प्रेरणादायी आहे.पट्टेबहादूर यांचं वय वर्षे ७५. ते वाशिम तालुक्यातील सुपखेला येथील रहिवाशी आहेत. परिसरातील ग्रामीण भागात संगीताच्या मैफली रंगविण्यासाठी त्यांना सातत्याने आमंत्रणे येत असतात. दोन्ही हाताला बोटं नसलेले पट्टेबहादूर उत्तम हार्मोनियम वाजवितात. प्रत्येक कार्यक्रमात रसिकांसाठी हा आश्चर्याचा विषय ठरतो. कुणीही गुरु नसताना त्यांनी भजन, कीर्तनातून इतर वादकांच्या वादनाचा अभ्यास केला. हार्मोनियम वादन शिकले. पुढे त्यांनी गावातील भजनी मंडळात वादकाची भूमिका वठविणे सुरु केले. पहाडी आवाजात एकनाथांची भारुडे ते गात असत. वैराग्यमूर्ती गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे कीर्तन त्यांनी प्रत्यक्ष ऐकले. त्यांचे विचारच त्यांना जगण्याची ऊर्जा देवून गेले. सद्यस्थितीत ते एकटेच राहतात. शिक्षण केवळ पहिल्या वर्गापर्यंत झाले. त्यांनी लग्न केले नाही. एका घराशिवाय त्यांच्याकडे कोणतीही वडिलोपार्जीत संपत्ती नाही. ते राष्ट्रसंतांच्या अभंगाबरोबर भीमगीते गातात. त्यासाठी त्यांनी धम्म प्रसारक कला संच स्थापन केला. स्वाभिमान तेवत ठेवून संगीताच्या मैफली रंगविणे त्यांना आवडते. जिद्द असली की, जीवनातील उत्सवाचा झरा कधीच आटत नाही, हे त्यांच्या संघर्षमय आयुष्याकडे पाहिले की लक्षात येते.