‘मधुमेहा’मध्ये पीएचडी!
By Admin | Updated: July 1, 2014 12:48 IST2014-07-01T01:52:47+5:302014-07-01T12:48:58+5:30
अकोला जिल्ह्यातील निपाणा या छोट्याशा गावातील अल्पभूधारक शेतकर्याच्या मुलाने गाठले यशोशिखर!

‘मधुमेहा’मध्ये पीएचडी!
अकोला : अल्पभूधारक शेतकर्याच्या मुलाने वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात यशोशिखर गाठले आहे. अकोला जिल्ह्यातील निपाणा या छोट्याशा गावातील जिल्हा परिषद शाळेत शिकलेल्या योगेश दिनकरराव वर्गे या मुलाने मधुमेह या विषयात पीएचडी मिळविली आहे.
वडील अल्पभूधारक, घरची आर्थिक परिस्थिती जेमतेम. दोन भाऊ आणि बहिणी, असा संसाराचा गाडा हाकताना दिनकरराव वर्गे यांनी मुलांना उच्चशिक्षित करण्याचा ध्यास घेतला. प्रसंगी पोटाला चिमटा घेऊन, त्यांनी एका मुलाला डॉक्टर, तर दुसर्याला पोलिस उपनिरीक्षक केले. मुलीलाही बीएड्पर्यंत शिक्षण देऊन स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी बळ दिले. आई-वडिलांच्या संघर्षाला यशाचे गोड फळ मिळवून देण्याचे काम त्यांच्या मुलांनी केले. योगेशने हलाखीच्या परिस्थितीतही आधी एमबीबीएस आणि आता मधुमेह या विषयात पीएचडी केली आहे. राज्यात या विषयासाठी केवळ दोन जागा आहेत. त्यातील एक जागा मुंबई येथील केईएम हॉस्पिटलमध्ये, तर दुसरी नायर हॉस्पिटलमध्ये आहे. योगेशने ६५ टक्के गुण मिळवून त्यातही प्रथम येण्याचा मान मिळविला.