पुनर्मूल्यांकनात पात्र १,३८१ शाळांना टप्प्याटप्प्याने अनुदान
By Admin | Updated: March 31, 2015 02:58 IST2015-03-31T02:58:57+5:302015-03-31T02:58:57+5:30
कायम विनाअनुदानित यामधील ‘कायम’ शब्द वगळल्यानंतर पुनर्मूल्यांकनानंतर १,३८१ शाळा पात्र ठरल्या असून, त्यांना टप्प्याटप्प्याने अनुदान देण्यात येईल

पुनर्मूल्यांकनात पात्र १,३८१ शाळांना टप्प्याटप्प्याने अनुदान
मुंबई : कायम विनाअनुदानित यामधील ‘कायम’ शब्द वगळल्यानंतर पुनर्मूल्यांकनानंतर १,३८१ शाळा पात्र ठरल्या असून, त्यांना टप्प्याटप्प्याने अनुदान देण्यात येईल, अशी घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सोमवारी विधान परिषदेत केली.
रामनाथ मोते व विक्रम काळे यांनी याबाबत दोन स्वतंत्र लक्षवेधी सूचना दाखल केल्या होत्या. शिक्षणमंत्री तावडे म्हणाले, की २० जुलै २००९ रोजी ‘कायम’ हा शब्द वगळण्यात आला. त्यानंतर पहिल्या टप्प्यात पुनर्मूल्यांकन करून १,५५१ प्राथमिक शाळांपैकी ३८६ पात्र घोषित केल्या गेल्या. माध्यमिक १,८९१ शाळांपैकी ५८ शाळा पात्र घोषित केल्या गेल्या. दुसऱ्या टप्प्यात ३७१ प्राथमिक व १,०१० माध्यमिक शाळा पात्र ठरल्या. पुनर्मूल्यांकनात १५१ प्राथमिक व २८० माध्यमिक शाळा अपात्र ठरल्या. त्यानंतर पुनर्मूल्यांकन थांबवले गेले.
दरम्यान, शालेय शिक्षण विभागाने मे २०१४ मध्ये उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांतील ९२६ पदांचा मान्यता दिली. मात्र वेतनाकरिता निधीची तरतूद पुरवणी मागण्यांमध्ये केली नाही, ही बाब मोते यांनी निदर्शनास आणली व शिक्षण खात्याच्या सचिवांना शिल्लक रकमेतून ही रक्कम देण्यास प्राधिकृत करण्याची मागणी केली. शिक्षणमंत्री तावडे यांनी ती मान्य केली. (विशेष प्रतिनिधी)