खापरी स्पेशलमधून पेट्रोल गळती

By Admin | Updated: February 2, 2015 01:08 IST2015-02-02T01:08:28+5:302015-02-02T01:08:28+5:30

माल वाहतुकीचे सर्वात महत्त्वाचे व सुरक्षित साधन म्हणून रेल्वेकडे पाहिले जाते; पण या विश्वासाला रेल्वे प्रशासनाद्वारे हादरे दिले जात आहेत. वर्धा रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक १ च्या लूपलाईनवर

Petrol leakage from Khapri special | खापरी स्पेशलमधून पेट्रोल गळती

खापरी स्पेशलमधून पेट्रोल गळती

रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष : चार वॅगनमध्ये सुरू होते लिकेज
प्रशांत हेलोंडे - वर्धा
माल वाहतुकीचे सर्वात महत्त्वाचे व सुरक्षित साधन म्हणून रेल्वेकडे पाहिले जाते; पण या विश्वासाला रेल्वे प्रशासनाद्वारे हादरे दिले जात आहेत. वर्धा रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक १ च्या लूपलाईनवर उभ्या असलेल्या खापरी स्पेशलमधून पेट्रोल गळती होत असताना त्याकडे केलेल्या दुर्लक्षातून याचा प्रत्यय आला. याबाबत रेल्वे प्रशासनाकडे तक्रारी केल्यानंतरही प्रवाशांचा जीव धोक्यात घालत दुर्लक्ष केले गेले़
वर्धा रेल्वे स्थानकावरून दररोज शेकडो मालगाड्या धावतात. यातील बहुतांश मालगाड्या सिग्नल न मिळणे, पुढे गाडी असणे वा अन्य तांत्रिक अडचणींमुळे थांबवून ठेवल्या जातात. वर्धा रेल्वे स्थानकावर पानेवाडी ते खापरी डेपो ही ५० वॅगन असलेली पेट्रोल भरलेली खापरी स्पेशल शनिवारी (दि़३१) रात्री १ वाजतापासून उभी होती. खापरी डेपोमध्ये जागा उपलब्ध नसल्याने ही गाडी वर्धेतच थांबविण्यात आली़ या मालगाडीच्या चार वॅगनमधून पेट्रोलची गळती सुरू होती. यात वॅगन क्रमांक ९८६७६५, ४००८१११०७३१, १२२०२० यासह आणखी एका वॅगनचा समावेश होता. ही बाब एका जागरुक रेल्वे प्रवाशाच्या लक्षात आली. कर्तव्य समजून त्यांनी स्टेशन प्रबंधक आणि रेल्वे पोलिसांना माहिती दिली; पण दुपारी १२.३० वाजेपर्यंत पाहणीही करण्यात आली नाही. यानंतर रेल्वे पोलिसांनी वरपांगी पाहणी करीत ही गळती नॉर्मल असल्याचा अहवाल दिला; पण ती रोखण्यासाठी प्रयत्न केले नाही़ या खापरी स्पेशलच्या चार वॅगनमधून दुपारी ४.३० वाजेपर्यंत पेट्रोलची गळती सुरूच होती. या मालगाडीतील काही वॅगनला सील लावण्यात आलेले होते तर काही वॅगनला सीलही नव्हते. शिवाय सील असलेल्या व नसलेल्या वॅगनमधूनही पेट्रोलची गळती सुरू होती.
वर्धा रेल्वे स्थानकावरून प्रत्येक आठ ते दहा मिनिटांनी प्रवासी रेल्वेगाड्यांची ये-जा सुरू असते. या प्रवाशांच्या सुरक्षिततेची बाब लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने मालगाडीची पाहणी करून गळती बंद करणे गरजेचे होते; पण तसे झाले नाही. वर्धा रेल्वे प्रशासनाला प्रवाशांच्या जीविताचे सोयरसुतक नसल्याचेच दिसते.
खापरी स्पेशल वर्धा रेल्वे स्थानकावर रात्रीपासून दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत थांबविण्यात आली होती. तिच्या बहुतांश वॅगनला सील नव्हते. तसेच चार वॅगनमधून गळतीही सुरू होती. ही मालगाडी निर्जन रेल्वे स्थानकावर वा मधेच कुठे थांबली असती तर पेट्रोल चोरी वा अपघाताचा धोका टाळता अशक्य होते़
चोरट्यांना पर्वणी
पुढे प्रवासी रेल्वे गाड्या असल्या वा सिग्नल नसला तर मालगाड्यांना कुठेही थांबविले जाते. अशात सील नसलेल्या पेट्रोल, डिझेलच्या वॅगन चोरट्यांना पर्वणी ठरतात. कोळसा चोरी तर नवीन नाही. चंद्रपूरहून निघालेल्या प्रत्येक मालगाडीतून चोरटे जीव धोक्यात घालून कोळसा चोरतात़ अनेकांचे संसारही या चोरीवर चालतात.

Web Title: Petrol leakage from Khapri special

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.