एलआयसी घोटाळ्यातील आरोपीचा जामीन रद्द करण्यासाठी याचिका
By Admin | Updated: February 7, 2017 19:37 IST2017-02-07T19:37:06+5:302017-02-07T19:37:06+5:30
एलआयसी घोटाळा प्रकरणातील आरोपी तत्कालीन रोखपाल एडी़ बैनवाड याचा न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
_ns.jpg)
एलआयसी घोटाळ्यातील आरोपीचा जामीन रद्द करण्यासाठी याचिका
ऑनलाइन लोकमत
लातूर, दि. 7 - जिल्हा पोलीस दलातील एलआयसी घोटाळा प्रकरणातील आरोपी तत्कालीन रोखपाल एडी़ बैनवाड याचा न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. तो रद्द करावा यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे.
लातूर जिल्हा पोलीस दलातील जवळपास अडीच हजार पोलिसांच्या ७ हजार विमा पॉलिसीच्या कोट्यवधींच्या घोटाळा प्रकरणात सहभागी असलेल्या झारीतील शुक्राचार्याचा शोध घेऊन त्याच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी २७ नोव्हेंबर रोजी अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक लता फड यांच्या फिर्यादीवरून जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील तत्कालीन रोखपाल एडी़ बैनवाड आणि एलआयसी एजंट पांडुरंग विश्वनाथ गीते याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणात तातडीने एलआयसी एजंट गीतेला आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने तातडीने अटक केली. त्याची चौकशी सुरू असतानाच तत्कालीन रोखपाल ए़डी़ बैनवाड याने अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या प्रकरणात न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे आर्थिक गुन्हे शाखेच्या तपास पथकाला बैनवाडला अटक करता येत नाही. या प्रकरणाचा अद्याप तपास आणि चौकशी पूर्ण झाली नाही. त्यासाठी बैनवाडची अटक महत्वाची असल्याचे आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर तट यांनी सांगितले. जोपर्यंत बैनवाडची अटक आणि चौकशी पूर्ण होणार नाही, तोपर्यंत एलआयसी घोटाळ्याचे तपासाचे कामकाज पूर्ण होणार नाही. त्यासाठी जिल्हा न्यायालयाने मंजूर केलेला बैनवाड याचा अटकपूर्व जामीन रद्द करावा, यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे.