आॅनलाइन औषध विक्रीविरोधात याचिका
By Admin | Updated: October 7, 2015 02:06 IST2015-10-07T02:06:38+5:302015-10-07T02:06:38+5:30
डॉक्टरांच्या लिखित सल्ल्याशिवाय आॅनलाइन औषध विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यावर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात

आॅनलाइन औषध विक्रीविरोधात याचिका
मुंबई : डॉक्टरांच्या लिखित सल्ल्याशिवाय आॅनलाइन औषध विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यावर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.
नवी मुंबईतील सामाजिक कार्यकर्त्या व प्राध्यापिका मयूरी पाटील यांनी ही याचिका अॅड. वल्लरी जठार यांच्यामार्फत दाखल केली आहे. आॅनलाइन औषधांच्या विक्रीसह संबंधित संकेतस्थळांवरही बंदी घालण्यात यावी, अशी मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली. न्या. नरेश पाटील व न्या. एस. बी. शुक्रे यांच्या खंडपीठाने या याचिकेवरील सुनावणी ७ आॅक्टोबर रोजी ठेवली आहे. देशात डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय आॅनलाइन औषध विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यात अशा काही औषधांचा समावेश आहे, ज्यामुळे आरोग्याला धोका होऊ शकतो. अशा औषधांमध्ये झोपेच्या गोळ्या, गर्भनिरोधक गोळ्या इत्यादींचा समावेश आहे. डॉक्टरांच्या लिखित सल्ल्याशिवाय या औषधांची विक्री आॅनलाइन होत असून, त्याचा दुरुपयोग केला जात आहे. त्यामुळे अशा आॅनलाइन औषध विक्रीवर बंदी आणावी, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे. याचिकेत केंद्र व राज्य सरकार आणि अन्न व औषध प्रशासनाला प्रतिवादी करण्यात आले आहे. ही संकेतस्थळे बेकायदेशीर असूनही शासनाकडून कठोर पावले उचलण्यात येत नसल्याचेही नमूद करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)