पीटर मुखर्जीही आता संशयाच्या फेऱ्यात

By Admin | Updated: September 3, 2015 01:44 IST2015-09-03T01:44:17+5:302015-09-03T01:44:17+5:30

शीना मुखर्जी खून प्रकरणात पीटर मुखर्जीच्या मानेभोवती फास आवळत चालला आहे. शीनाची आई इंद्राणीच्या आयुष्यात काय चालले आहे हे मला माहिती नव्हते असा दावा आतापर्यंत पीटर मुखर्जी करीत होता

Peter Mukherjee is now in doubt round | पीटर मुखर्जीही आता संशयाच्या फेऱ्यात

पीटर मुखर्जीही आता संशयाच्या फेऱ्यात

मुंबई : शीना मुखर्जी खून प्रकरणात पीटर मुखर्जीच्या मानेभोवती फास आवळत चालला आहे. शीनाची आई इंद्राणीच्या आयुष्यात काय चालले आहे हे मला माहिती नव्हते असा दावा आतापर्यंत पीटर मुखर्जी करीत होता. पण मुंबई पोलिसांतील वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आता पीटर मुखर्जीला अनेक गोष्टींचे स्पष्टीकरण द्यावे लागेल किंवा अटकेत जावे लागेल. पीटरच्या ब्रिटन आणि स्पेनमधील बँक खात्यांची पोलिसांना चौकशी करायची आहे ती खुनाचा उद्देश काय होता आणि त्याचा संबंध हा पैशांशी होता का या अंगाने. यातून त्यांना काही पुरावे मिळतात का हे बघायचे आहे, अशी ‘लोकमत’ची माहिती आहे.
आठ दिवसांत प्रथमच पोलिसांनी पीटर आणि इंद्राणीला समोरासमोर आणले होते. त्यानंतर शीना बोरा खून प्रकरणात पीटर मुखर्जीची काय भूमिका होती याचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. पोलिसांनी पीटरच्या वरळीतील निवासस्थानी छापे घातले त्याच्या निवासस्थानाहून गुन्ह्याशी संबंध दाखविणारी कागदपत्रे जप्त केली आहेत व प्रत्येक गोष्टीचे स्पष्टीकरण मागत आहोत. आम्ही त्याला इंद्राणीच्या समोर आणले व त्याला बघताच तिला रडू कोसळले. आम्ही पीटरची कुटुंब, पैसा आणि गुन्ह्याच्या मुद्यांवर चौकशी केली, असे हा अधिकारी म्हणाला.
आयएनएक्स मीडिया विकून आलेल्या पैशापैकी बहुतेक रक्कम पीटरने लंडन आणि स्पेनमध्ये ठेवली आहे. परराष्ट्रविषयक संबंधांच्या माध्यमातून आम्ही त्या बँकांशी पत्रव्यवहार करून त्यांच्याकडून खात्याचा तपशील मागवून घेऊ व आमच्याकडील पुराव्यांशी तो ताडून बघू, असेही अधिकाऱ्याने सांगितले. इंद्राणीने पीटरला शीना ही माझी मुलगी नसून बहीण असल्याचे सांगितले होते. जेव्हा शीना ही तिची मुलगी असल्याचे उघडकीस आले त्यावेळी मला धक्का बसला, असे मुखर्जीने पोलिसांना सांगितले आहे. इंद्राणी तिचा दुसरा पती संजीव खन्ना याच्या संपर्कात असल्याचे समोर आल्यावर मला धक्का बसल्याचेही पीटरने म्हटले होते. इंद्राणीवर संशय घ्यावा, असे कोणतेही कारण माझ्याकडे नव्हते आणि शीना अमेरिकेत आहे हे तिने मला पटवून दिले होते, असे पीटर मुखर्जी सांगत आला आहे. तेव्हा आधी आम्हाला इंद्राणीमुळे पीटर संकटात सापडल्याचे वाटले होते. परंतु इंद्राणीची चौकशी जसजशी पुढे सरकत होती तशा एकेक गोष्टी समोर येत गेल्या. त्यामुळे पीटरही त्या कटाचा भाग होता का याची आम्ही आता चौकशी करीत आहोत. पुरावा मिळताच त्याला अटक केली जाईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

सिद्धार्थ दास यांची चौकशी
कोलकाता : इंद्राणी मुखर्जी हिचा ‘लिव्ह इन पार्टनर’ राहिलो असल्याचा दावा करणारे सिद्धार्थ दास यांची मुंबई पोलिसांनी बुधवारी कोलकात्यात चौकशी केली. डमडम पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. शीना बोरा ही आपली व इंद्राणीची मुलगी असल्याचा दावा मंगळवारी दास यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर शीना बोरा हत्याकांड प्रकरणी मुंबई पोलिसांचे तीन अधिकारी रात्री ८च्या सुमारास दास यांच्या डमडम भागातील दुर्गानगर येथील निवासस्थानी पोहोचले. रात्री उशिरापर्यंत त्यांची चौकशी सुरू होती. शीनाच्या हत्याप्रकरणात दासचा काही संबंध आहे वा नाही, यादृष्टीने मुंबई पोलीस शोध करत आहे, असे संबंधित अधिकाऱ्याने सांगितले. इंद्राणीच्या उपस्थितीत दास याची चौकशी होऊ शकते का, या प्रश्नाला उत्तर देताना अशी शक्यता आहे, असे या अधिकाऱ्याने सांगितले.

संजय खन्नाचा लॅपटॉप, कागदपत्रे जप्त
मुंबई पोलिसांच्या एका पथकाने इंद्राणी मुखर्जीचा दुसरा पती आणि सहआरोपी संजीव खन्ना याच्या कोलकात्यातील घरातून बुधवारी एक लॅपटॉप तसेच बँक खाती व गुंतवणुकीशी संबंधित दस्तावेज जप्त केले. मुंबई पोलीस स्थानिक पोलिसांसोबत सकाळीच हॅस्टिंग्ज येथील त्याच्या घरी गेले होते, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संजीव खन्नाचा लॅपटॉप जप्त करण्यासाठी मुंबई पोलिसांना सर्च वॉरंटची गरज होती. या कामात त्यांनी स्थानिक पोलिसांची मदत घेतली.

पीटर मुखर्जींची १२ तास चौकशी
शीणा बोरा हत्येप्रकरणी खार पोलिसांनी बुधवारी तब्बल १२ तासांहून अधिक वेळ पीटर मुखर्जी यांची कसून चौकशी केली. खार पोलीस ठाण्यात इंद्राणी, संजीव खन्ना आणि पीटर मुखर्जी यांची समोरासमोर चौकशी झाल्याची माहिती आहे. रात्री ११ वाजल्यानंतर पीटर मुखर्जी खार पोलीस ठाण्यातून बाहेर पडले.

Web Title: Peter Mukherjee is now in doubt round

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.