ठाण्यात रस्त्यावर मंडपांना परवानगी
By Admin | Updated: July 10, 2015 03:52 IST2015-07-10T03:52:10+5:302015-07-10T03:52:10+5:30
रस्त्याच्या एकचतुर्थांश भागावर मंडपाला परवानगी देणारे धोरण आखल्याची माहिती ठाणे महापालिकेने गुरुवारी उच्च न्यायालयात दिली

ठाण्यात रस्त्यावर मंडपांना परवानगी
मुंबई : रस्त्याच्या एकचतुर्थांश भागावर मंडपाला परवानगी देणारे धोरण आखल्याची माहिती ठाणे महापालिकेने गुरुवारी उच्च न्यायालयात दिली. रस्त्यावरच्या मंडपांचा तिढा सोडवण्यासाठी ठाणे महापालिकेने एक पाऊल पुढे टाकले असून, अन्य महापालिका याचे अनुकरण करणार की रस्त्यांवर मंडपांना परवानगी नाकारणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
एकतृतीयांश रस्ता मंडपांना दिल्याचे प्रतिज्ञापत्र ठाणे पालिकेने न्यायालयात सादर केले होते. मात्र यात बदल करून एकचतुर्थांश रस्ता मंडपांना देणार असल्याचे पालिकेचे वकील ज्येष्ठ विधिज्ञ राम आपटे यांनी न्या. अभय ओक व न्या. रेवती मोहिते-ढेरे यांच्या खंडपीठाला सांगितले.
रस्त्यावर मंडप उभारण्यासाठी येणाऱ्या अर्जांनुसार प्रत्येक मंडळ, त्यांची मागणी व उपलब्ध रस्ता, याचा आढावा घेतल्यानंतरच परवानगी देण्यात येणार आहे. उर्वरित रस्ता नागरिकांसाठी व वाहनांच्या रहदारीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असेही न्यायालयात स्पष्ट करण्यात आले. याबाबत स्वतंत्र प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश पालिकेला दिले आहेत.
महत्त्वाचे म्हणजे रस्त्यावर मंडपच नको, या न्यायालयाच्या भूमिकेने बहुतांश मंडळे चिंतित आहेत. त्यातच काही दिवसांवर दहीकाला उत्सव आला आहे. ठाण्यात अनेक ठिकाणी दहीहंडीसाठी मंडप उभारण्यात येतात. ठाणे पालिकेचे धोरण न्यायालयाने मान्य केल्यास मंडळांना दिलासा मिळू शकेल. दुसरीकडे आता इतर पालिका ठाणे पालिकेचे अनुकरण करणार की रस्त्यावरील मंडपांना कायमची बंदी घालणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)