नगरपरिषदा, नगरपंचायतींसाठी नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यास परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2016 18:17 IST2016-10-28T18:17:02+5:302016-10-28T18:17:02+5:30
पहिल्या टप्प्यातील नामनिर्देशनपत्रे पारंपरिक पद्धतीने (Offline) स्वीकारण्यास राज्य निवडणूक आयोगाने परवानगी दिली

नगरपरिषदा, नगरपंचायतींसाठी नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यास परवानगी
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 28 - नगरपरिषद व नगरपंचायतींच्या चारपैकी पहिल्या टप्प्यातील नामनिर्देशनपत्रे पारंपरिक पद्धतीने (Offline) स्वीकारण्यास राज्य निवडणूक आयोगाने परवानगी दिली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली.
सहारिया यांनी सांगितले की, नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्रे व शपथपत्रे सहजरीत्या भरता यावेत, यासाठी माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या मदतीने संगणक प्रणाली विकासित करण्यात आली आहे. त्या माध्यमातून 24 ऑक्टोबर 2016 पासून नामनिर्देशनपत्रे भरण्याची कार्यवाही सुरू आहे; परंतु या संगणक प्रणालीबाबत काही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्याबाबत आम्ही संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेतला. यावेळी माहिती व तंत्रज्ञान विभाग आणि महाऑनलाईनचेही प्रतिनिधी उपस्थित होते.
नामनिर्देशनपत्रे आणि शपथपत्रे भरण्यासाठी आवश्यक त्या सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या असल्याचे या प्रतिनिधींनी सांगितले; परंतु इच्छूक उमेदवारांना 29 ऑक्टोबर 2016 पर्यंत नामनिर्देशनपत्रे व शपथपत्रे भरणे श क्य व्हावे, यासाठी पारंपरिक पद्धत अवलंबविण्याची परवानगी देण्यात आली आहे.