आॅनलाइन नोंदणीनंतरच कायमस्वरूपी वाहनचालक परवाना
By Admin | Updated: December 1, 2014 01:57 IST2014-12-01T01:57:07+5:302014-12-01T01:57:07+5:30
प्रादेशिक परिवहन विभागाने शिकाऊ परवान्यानंतर (लर्निंग लायसन्स) आता वाहन चालविण्याचा कायमस्वरुपी परवाना (परमनन्ट लायसन्स) देण्यापूर्वी आॅनलाईन नावनोंदणी अनिवार्य केली आहे.

आॅनलाइन नोंदणीनंतरच कायमस्वरूपी वाहनचालक परवाना
वाशिम : प्रादेशिक परिवहन विभागाने शिकाऊ परवान्यानंतर (लर्निंग लायसन्स) आता वाहन चालविण्याचा कायमस्वरुपी परवाना (परमनन्ट लायसन्स) देण्यापूर्वी आॅनलाईन नावनोंदणी अनिवार्य केली आहे. सोमवारपासून (१ डिसेंबर) याची अंमलबजावणी होणार आहे.
लर्निंग लायसन्सच्या परीक्षेकरिता उमेदवारांचा वेळ, पैसा आणि श्रम खर्च होऊ नये, यासाठी राज्यभरात १ सप्टेंबरपासून ‘आॅनलाईन अपॉईन्टमेंट’ची सुविधा अंमलात आणण्यात आली. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर, परमनन्ट लायसन्सच्या परीक्षेसाठीही हीच पद्धत लागू करण्याचा विचार परिवहन विभागाचा होता. आता सोमवारपासून त्याचीही अंमलबजावणी होणार असून या परीक्षेसाठीही आॅनलाईन नावनोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे.
आॅनलाईन नावनोंदणीद्वारे परमनन्ट लायसन्ससाठी द्याव्या लागणाऱ्या परीक्षेची तारीख व वेळ निवडण्याचे स्वातंत्र्य उमेदवारांना बहाल करण्यात आले आहे.
आॅनलाईन नावनोंदणी केलेल्या उमेदवारांनाच परमनन्ट लायसन्सची परीक्षा देता येणार आहे. या
प्रक्रियेमुळे नागरिकांना परिवहन कार्यालयात रांगेत उभे राहण्याची आवश्यकता राहणार नाही. सकाळी १० ते ११, ११ ते १२, दुपारी १२ ते १ व दुपारी १ ते २ अशा चार वेळेत परीक्षा देण्याचा पर्याय अर्जदारांना निवडता येईल.