जनतेची कामे जलदगतीने करा
By Admin | Updated: October 20, 2015 01:31 IST2015-10-20T01:31:43+5:302015-10-20T01:31:43+5:30
मंत्रालयात घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी खालच्या स्तरावर तातडीने करत जा आणि प्रशासन जलदगतीने काम करते आहे हे जनतेला कळू द्या, अशा शब्दांत मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय

जनतेची कामे जलदगतीने करा
मुंबई : मंत्रालयात घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी खालच्या स्तरावर तातडीने करत जा आणि प्रशासन जलदगतीने काम करते आहे हे जनतेला कळू द्या, अशा शब्दांत मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी आज राज्यातील अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. तसेच शेतकरी आत्महत्याग्रस्त भागांतील सिंचन विहिरींची अपूर्ण कामे मार्चपर्यंत पूर्ण करा, असा आदेशही त्यांनी दिला.
व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यातील पीक परिस्थिती, दुष्काळी परिस्थितीत करावयाच्या उपाययोजना, स्वच्छ महाराष्ट्र, जलयुक्त शिवार, आधार क्रमांक नोंदणी आदींचा आढावा मुख्य सचिवांनी घेतला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईत राज्यात ४२ जणांना न्यायालयाने दोषी ठरविले आहे. मात्र, अजूनही त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले नाही. या कारवाईस विलंब का झाला, अशी विचारणा करून कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येईल, अशी तंबीही त्यांनी दिली.
यवतमाळ आणि उस्मानाबाद जिल्ह्यांमध्ये चार वर्षांत प्रत्येकी चार हजार शेततळी करण्यात येणार आहेत. त्यासाठी तुम्ही काय तयारी केली, अशी विचारणाही क्षत्रिय यांनी केली. धडक सिंचन विहिरी, जवाहर विहिरींची कामे अपूर्ण आहेत. मार्च २०१६पर्यंत कामे पूर्ण झाली पाहिजेत, हे काम नरेगाच्या माध्यमातून मध्य प्रदेशात यशस्वी होते, मग महाराष्ट्र मागे राहता कामा नये, असेही त्यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)