मुळा नदीकाठावर बारमाही पीक!
By Admin | Updated: August 15, 2015 00:57 IST2015-08-15T00:57:11+5:302015-08-15T00:57:11+5:30
नद्यांमधील वाळूच्या बेसुमार उपशामुळे पाणी वेगाने वाहून जाते, परिणामी जमिनीत पाणी न जिरल्याने परिसरातील विहिरी पावसाळ्यानंतर कोरड्याठाक पडतात. मुळा नदी काठावरील

मुळा नदीकाठावर बारमाही पीक!
- भाऊसाहेब येवले, राहुरी
नद्यांमधील वाळूच्या बेसुमार उपशामुळे पाणी वेगाने वाहून जाते, परिणामी जमिनीत पाणी न जिरल्याने परिसरातील विहिरी पावसाळ्यानंतर कोरड्याठाक पडतात. मुळा नदी काठावरील सात गावांनी मात्र वाळूउपशाविरोधात यशस्वी मोहीम राबविल्याने १० कि.मी. परिसरातील विहिरी १२ महिने पाण्याने भरलेल्या असतात. त्यामुळे येथे शेती बहरली आहे.
मुळा नदीकाठावरील वांजुळपोई, मांजरी, निंभारी, अंमळनेर, पानेगाव, करजगाव या सात गावांनी ग्रामसभेत ठराव करून वाळू उचलेगिरीला ब्रेक लावला. गामस्थांनी न्यायालयाचाही दरवाजा ठोठावला़ एवढ्यावरच न थांबता ग्रामस्थांनी वाळूउपसा करणाऱ्या सैन्य दलातील जवानांना पिटाळून लावले होते़
वाळू जपण्याचा लढा तसा अवघड होता़ वाळूउपशामुळे पाण्याअभावी परिसराचे वाळवंट होऊन शेती व जनावरांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होईल, असा युक्तिवाद त्यांनी न्यायालयात केला़ न्यायालयाला शेतकऱ्यांचे म्हणणे पटले आणि वाळू उचलण्यास मज्जाव करण्यात आला.
सात गावांतील ग्रामस्थांनी वाळू संदर्भात नियमच घालून दिला आहे़ स्थानिकांना घर बांधण्यासाठी वाळू हवी तर, आवश्यक तेवढाच उपसा करायचा. ग्रामस्थांच्या एकीमुळे नदीपात्रात वाळू पाहायला मिळते. त्यामुळे पाण्याच्या प्रवाहाचा वेग मंदावल्याने जमिनीत पाणी जिरण्याचे प्रमाण खूपच वाढले आहे. परिणामी, दुष्काळातही विहिरींच्या पाण्याची पातळी समाधानकारक आहे.
मुळा धरणाच्या पायथ्याला बेसुमार वाळूउपसा झाल्याने बारागाव नांदुर, राहुरी, देसवंडी आदी गावांमध्ये विहिरींनी तळ गाठला़ २० फुटांपर्यंत वाळूउपसा झाल्यामुळे विहिरींचे अस्तित्व धोक्यात आले आहे़ याउलट मांजरीसह अन्य गावांत ऊस, चारा, कापूस, गहू व भाजीपाल्याचे जोमदार पीक आले आहे.