टक्का वाढला ; धक्का कुणाला ?
By Admin | Updated: October 16, 2014 00:59 IST2014-10-16T00:59:13+5:302014-10-16T00:59:13+5:30
नागपूर जिल्ह्यातील विधानसभेच्या १२ जागांसाठी जिल्ह्यात सरासरी ६१ टक्के मतदान झाले. सर्वाधिक मतदान काटोलमध्ये (७१ टक्के) तर सर्वात कमी पश्चिम, दक्षिण आणि मध्य मध्ये (५७ टक्के) मतदान झाले.

टक्का वाढला ; धक्का कुणाला ?
नागपूर : नागपूर जिल्ह्यातील विधानसभेच्या १२ जागांसाठी जिल्ह्यात सरासरी ६१ टक्के मतदान झाले. सर्वाधिक मतदान काटोलमध्ये (७१ टक्के) तर सर्वात कमी पश्चिम, दक्षिण आणि मध्य मध्ये (५७ टक्के) मतदान झाले. जिल्ह्यातील ३७०५३६५ मतदारांपैकी २२४३१८९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. २००९ च्या निवडणुकीच्या तुलनेत (५५.८१ टक्के) ५.१९ टक्के मतदानात वाढ झाली आहे. किरकोळ प्रकार वगळता मतदान शांततेत पार पडले. सर्वच प्रमुख पक्षातील दिग्गज उमेदवारांसह एकूण २११ जणांचे भाग्य मतदान यंत्रात (ईव्हीएम) बंद झाले असून रविवारी १२ विविध ठिकाणी मतमोजणी होणार आहे.
पावसाचा व्यत्यय
सकाळी मतदानाच्या पहिल्या सत्रात पवासाने हजेरी लावल्याने सर्वच ठिकाणी तारांबळ उडाली. केंद्रावर मतदारांची, बुथवर कार्यकर्त्यांची धावपळ उडाली. मतदान संथ झाले.पण दुपारनंतर गर्दी वाढल्याने अधिकाऱ्यांचा ताण वाढला. पाऊस आल्यावरही अनेकांनी छत्री घेऊन मतदान केंद्र गाठले.
सर्वत्र अफवांचे पीक
शहरात आज सकाळपासूनच अफवांचे पीक आले. कुठे गोळीबार, कुठे लाठीमार तर कुठे तोडफोड झाल्याची अफवा होती. कुठे पैसे वाटले जात असल्याची तर कुठे दारू मिळत असल्याचीही चर्चा होती. काही ठिकाणी प्रमूख उमेदवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाचीच्या घटना घडल्या. मात्र, पोलिसांकडे अनेक घटनांची नोंद नाही.
हेल्पलाईनवर तक्रारींचा पाऊस
प्रशासनाने मतदारांच्या समस्या निराकरणासाठी सुरू केलेल्या हेल्पलाईनवरून दिवसभर तक्रारींचा पाऊस पडत राहिला. बहुतेक मतदारांची तक्रार मतदार यादीत नाव नसल्याची होती. हेल्पलाईनवरील कर्मचारी संगणकीय प्रोग्रॅममधून तक्रारकर्त्याचे नाव, अनुक्रमांक, मतदान केंद्र इत्यादी माहिती शोधून देत होते. मतदान केंद्रात अनुचित प्रकार सुरू आहे, ईव्हीएम मशीन बंद पडली आहे, सुरक्षा व्यवस्था तोकडी आहे इत्यादी प्रकारच्या कोणत्याही तक्रारी आल्या नसल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.
दिग्गजांच्या भाग्याचा फैसला रविवारी
जिल्ह्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणीस (दक्षिण पश्चिम), काँग्रेसचे माजी मंत्री नितीन राऊत (उत्तर नागपूर), सतीश चतुर्वेदी (दक्षिण नागपूर), अनिस अहमद (मध्य नागपूर), सुबोध मोहिते (रामटेक), राजेंद्र मुळक (कामठी), राष्ट्रवादीचे अनिल देशमुख (काटोल), रमेश बंग ( हिंंगणा) रिंगणात आहेत. त्यांचे राजकीय भवितव्य सध्या ईव्हीएममध्ये बंद झाले आहे. त्यांच्या राजकीय भाग्याचा फैसला रविवारी होणाऱ्या मतदानाच्या वेळी होणार आहे.
मतदान केंद्राधिकाऱ्याला मारहाण
पक्षपातीपणाचा आरोप लावून मनसेच्या उमेदवाराने मतदान केंद्रावरील एका अधिकाऱ्याच्या श्रीमुखात भडकावली. या घटनेमुळे झिंगाबाई टाकळी (गिट्टीखदान) परिसरातील एका मतदान केंद्रावर काही काळ तणाव होता.
सकाळच्या पावसाच्या व्यत्ययानंतर मतदानाने गती घेतली. शहरातील सहा आणि ग्रामीणमधील सहा अशा एकूण बाराही मतदारसंघात मतदानासाठी उत्साह दिसून आला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, खासदार अजय संचेती, काँग्रेस नेते विलास मुत्तेमवार यांच्यासह विभागीय आयुक्त अनुपकुमार, जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांच्यासह इतरही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मतदानाचा हक्क बजावला. सांयकाळपर्यंत जिल्ह्यात ६१ टक्के मतदान झाल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कळविण्यात आले. (प्रतिनिधी)