जनताच मुश्रीफांना राजकारणातून हद्दपार करेल
By Admin | Updated: October 20, 2015 00:51 IST2015-10-20T00:42:09+5:302015-10-20T00:51:14+5:30
‘ताराराणी’चा पलटवार : तुम्ही जिल्हा बँक बुडवली त्याचे काय..?

जनताच मुश्रीफांना राजकारणातून हद्दपार करेल
कोल्हापूर : ‘महाडिक शहाणे की, कोल्हापूरकर मूर्ख’ असा प्रश्न आमदार हसन मुश्रीफ यांनी उपस्थित करून जनतेचा आणि लोकशाहीचा अवमान केला आहे. कोल्हापूरची जनता मुश्रीफांच्या दावणीला बांधलेली नाही, याचे भान ठेवावे; अन्यथा जनता तुम्हाला राजकीय जीवनातून हद्दपार करेल, असा प्रतिटोला ताराराणी आघाडीचे प्रवक्ते माजी महापौर सुनील कदम यांनी सोमवारी प्रसिद्धीपत्रकातून लगावला. आगामी महापालिका निवडणुकीत भाजप-ताराराणी आघाडीला बहुमत देऊन जनता शहाणी आहे, याचा प्रत्यय मुश्रीफांना येईल, असेही त्यांनी म्हटले आहे. रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महापालिका निवडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध करताना दसरा चौकात झालेल्या सभेत आमदार मुश्रीफ यांनी एकाच घरात तीन वेगवेगळ््या पक्षांतून निवडून आलेल्या महाडिक यांच्यावर ‘महाडिक शहाणे की कोल्हापूरकर मूर्ख’ अशी उपरोधिक टीका केली होती. मुश्रीफांनी केलेली ही टीका ‘ताराराणी’ला चांगलीच झोंबली. त्यामुळे तिचा खरपूस समाचार घेताना कदम यांनी पत्रकात म्हटले आहे की, ज्यांनी जिल्हा मध्यवर्ती बँक बुडवली, उद्योजकांना हैराण केले, त्यांनी महापालिकेत काय दिवे लावले हे सर्वांना माहीत आहे. दहा वर्षांत महापालिकेतील भोंगळ कारभारामुळेच कोल्हापूरचा स्मार्ट सिटीत समावेश होऊ शकला नाही. त्यांनी जनतेला भूलवण्याचे काम बंद करावे. महाडिक कुटुंबातील तिघांना जनतेने विश्वासाने निवडून दिले आहे. जनता दूधखुळी नसते तर सुज्ञ असते, याचे भान लोकप्रतिनिधींनी ठेवावे.
भाजप-ताराराणी महायुतीकडे विकासाची दृष्टी आहे. येत्या निवडणुकीत महायुतीला कौल देऊन जनता आपले शहाणपण सिद्ध करेल. पक्षीय पातळीवर निवडणूक होत आहे. असे असताना माजी मंत्र्यांना केवळ भाजप-ताराराणी आघाडीवर बोलावेसे वाटत आहे. याचा अर्थ त्यांनी आघाडीचा धसका घेतल्याचे स्पष्ट होते. ते वैफल्यातून अशी विधाने करत आहेत. नियोजनबद्ध विकास आराखडा घेऊन आघाडी निवडणुकीला सामोरे जात आहे. त्यामुळे जनता पाच वर्षांसाठी महापालिकेची एकहाती सत्ता भाजप-ताराराणी महायुतीकडे देईल, यात शंका नाही.
जनतेने खासदार केले...
कोणतीही सत्ता नसताना केलेले काम डोळ्यांसमोर ठेवून जनतेने धनंजय महाडिक यांना खासदार केले. खासदार महाडिक हे जनतेचा विश्वास सार्थ ठरवत, प्रामाणिकपणे काम करत आहेत. आमदार महादेवराव महाडिक, आमदार अमल महाडिक यांनी जनतेशी प्रतारणा केली नाही, म्हणून त्यांना विजय संपादन करता आला, असेही सुनील कदम यांनी पत्रकात म्हटले आहे.