"जनता जातीयवादी नाही, पुढारी जातीयवादी आहेत, ते..."; नितीन गडकरींनी नेत्यांना फटकारले
By भागवत हिरेकर | Updated: March 22, 2025 19:02 IST2025-03-22T18:59:50+5:302025-03-22T19:02:08+5:30
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सामाजिक वीण उसवत असल्याच्या मुद्द्यावर बोलताना नेत्यांना फटकारले. जातीयवादाला राजकारणी जबाबदार आहेत, असे म्हणत त्यांनी काही अपेक्षा व्यक्त केल्या.

"जनता जातीयवादी नाही, पुढारी जातीयवादी आहेत, ते..."; नितीन गडकरींनी नेत्यांना फटकारले
Nitin Gadkari News: गेल्या काही दिवसांपासून राज्यात सामाजिक एकोप्याला नख लावलं जात असल्याची चर्चा होत आहे. त्याबद्दल चिंताही व्यक्त होतेय. याच मुद्द्यावर केंद्रीय मंत्रीनितीन गडकरी यांनी रोखठोक मत मांडले. 'जनता जातीयवादी नाहीये, पुढारी जातीयवादी आहेत. ते स्वार्थासाठी जात पुढे करतात', अशा शब्दात राजकारण्यांना सुनावले. ते अमरावतीमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
केंद्रीय मंत्रीनितीन गडकरी यांना श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीने डॉ. पंजाबराव उर्फ भाऊसाहेब देशमुख स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी त्यांनी समाजातील अस्पृश्यता आणि जातीयवादावर भाष्य केले.
गडकरी म्हणाले, पुढारी जातीयवादी आहेत
नितीन गडकरी म्हणाले, "मी लोकसभेत निवडून आलो. मी लोकांना सांगितलं की, माझ्या आयुष्यात राजकारण चालेल, तुमच्या आयुष्यात नाही. तुम्हाला मत द्यायचं असेल, तर द्या नाही दिलं तरी चालेल. जो देईल त्याचंही काम करेल. नाही देणार त्याचंही काम करेल. मी हे उद्धटपणे नाही बोललो."
"मला सगळ्या लोकांनी मतदान केलं. हे पुढारी जात निर्माण करतात. जनता जातीयवादी नाहीये, पुढारी जातीयवादी आहेत. ते आपल्या स्वार्थाकरिता जात उभी करतात. कारण मागासपणा हा राजकीय स्वारस्याचा विषय आहे. कोण सर्वात जास्त मागास ही स्पर्धा आहे", असे भाष्य गडकरींनी केले.
नितीन गडकरींनी सांगितला बिहारमधील किस्सा
यावेळी गडकरींनी त्यांना दुसऱ्या राज्यात आलेला अनुभवही संगितला. ते म्हणाले, "मी उत्तर प्रदेश, बिहारमध्ये जातो. जसे आपल्याकडे मराठा-कुणबी आहेत, तसे तिकडे ब्राह्मण जात आहे. मी गेलो होतो. ते म्हणाले पंडित नितीन गडकरी आले. मी म्हटलं प्रश्न पडला पंडित का म्हणत आहेत? मी त्याला बोलावलं आणि विचारलं की, माझं पंडित म्हणून का नाव घेत आहात?"
...अन् गडकरी म्हणाले, माझं नाव पंडित म्हणून घ्यायचं नाही
गडकरी पुढे सांगताना म्हणाले, "तो म्हणाला, तुम्हाला माहिती नाहीये. पंडित अटलबिहारी वाजपेयी यांच्यानंतर आमच्या ब्राह्मणांच्या मनात जर दुसरं कुठलं नाव आहे, तर ते पंडित नितीन गडकरींचं नाव आहे, तुमचं नाव आहे. मी म्हणालो, जे काही असेल. पण, माझं नाव पंडित म्हणून घ्यायचं नाही. हे मी नाही करणार. खऱ्या अर्थाने खालचं वातावरण बदललं आहे. ते बदलण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे."
"माणूस हा जातीने मोठा नाहीये, गुणांनी मोठा आहे. या समाजातील अस्पृश्यता, जातीयता समूळ नष्ट झाली पाहिजे. मी कमीत कमी ती माझ्या व्यवहारात ठेवता कामा नये. या दोन गोष्टींमध्ये सुधारलं तर हळूहळू समाज बदलेल ना", अशी अपेक्षा नितीन गडकरींनी व्यक्त केली.