सार्वजनिक ठिकाणी सिगारेट ओढणाऱ्यांना दंड
By Admin | Updated: January 21, 2016 03:51 IST2016-01-21T03:51:50+5:302016-01-21T03:51:50+5:30
सार्वजनिक ठिकाणी सिगारेट ओढणाऱ्यांवर आता अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कारवाई सुरू केली आहे. दोन दिवसांत राज्यातील सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणाऱ्या १ हजार २५७ जणांना दंड ठोठावला आहे.

सार्वजनिक ठिकाणी सिगारेट ओढणाऱ्यांना दंड
मुंबई: सार्वजनिक ठिकाणी सिगारेट ओढणाऱ्यांवर आता अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कारवाई सुरू केली आहे. दोन दिवसांत राज्यातील सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणाऱ्या १ हजार २५७ जणांना दंड ठोठावला आहे. दोन दिवसांत एफडीएने सिगारेट आणि अन्यतंबाखूजन्य उत्पादने कायदा २००३ अंतर्गत १ हजार ५७३ व्यक्तींवर कारवाई करून २ लाख ४० हजार ७४० रुपयांचा दंड वसूल केला आहे.
एफडीए आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांच्या आदेशानुसार, गेल्या दोन दिवसांपासून राज्यात एफडीए अधिकाऱ्यांनी धडक कारवाई सुरू केली आहे. १८ आणि १९ जानेवारी या दोन दिवसांत शैक्षणिक संस्थांच्या १०० यार्ड परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची, सिगारेटची विक्री करणाऱ्या ३१६ व्यक्तींकडून ५५ हजार ७५० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे, तर २९ हजार ४१८ रुपये किमतीचा सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे. ‘शाळांजवळील टपऱ्या’ या विषयावर ‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशन करून हा विषय पुढे आणला होता. प्रशासनाचे आयुक्त डॉ. कांबळे यांनी सांगितले, ‘विद्यार्थ्यांचे आरोग्य लक्षात घेऊन राज्यभरात कारवाई सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. राज्यभरात ही धडक कारवाई सुरू झाली आहे.’