उपराजधानीतील ‘मोर’ शिकाऱ्यांचे टार्गेट!
By Admin | Updated: August 18, 2014 00:29 IST2014-08-18T00:29:30+5:302014-08-18T00:29:30+5:30
त्याचा सप्तरंगी पिसारा, त्याचे नृत्य आणि त्याची ती डौलदार चाल कुणालाही मोहित करते. म्हणूनच त्याला राष्ट्रीय पक्षी म्हणून मान्यता मिळाली आहे. मात्र सध्या शिकाऱ्यांनी या राष्ट्रीय पक्ष्याला टार्गेट

उपराजधानीतील ‘मोर’ शिकाऱ्यांचे टार्गेट!
जीवन रामावत - नागपूर
त्याचा सप्तरंगी पिसारा, त्याचे नृत्य आणि त्याची ती डौलदार चाल कुणालाही मोहित करते. म्हणूनच त्याला राष्ट्रीय पक्षी म्हणून मान्यता मिळाली आहे. मात्र सध्या शिकाऱ्यांनी या राष्ट्रीय पक्ष्याला टार्गेट केले आहे. नागपूरच्या सभोवताल हिरवेगार झुडपी जंगल असून, त्यात शेकडो मोरांचा अधिवास आहे. परंतु गत काही दिवसांपासून या मोरांना त्यांच्याच अधिवासात धोका निर्माण झाला आहे. शहरातील काही शिकारी टोळ्या त्यांना टार्गेट करून, त्यांची शिकार करीत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. त्यामुळे भीतीपोटी ते वस्त्यांपर्यंत पोहोचत आहे. मागील महिनाभरात अशा आठ ते दहा घटना घडल्या आहेत. यात अनेक मोर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला आहे तर काहींना वन विभागाच्या बचाव पथकाने गोरेवाडा जंगलात सोडले आहे.
परंतु या घटनांच्या निमित्ताने शहरातील मोरांच्या सुरक्षेचा फार मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. मोर हा एक राष्ट्रीय पक्षीच नव्हे, तर तो शेड्यूल (१) मधील पक्षी आहे. त्यामुळे वन कायद्यात त्यालाही वाघाएवढेच महत्त्व प्राप्त झाले आहे. वन विभागावर त्याच्या संपूर्ण सुरक्षिततेची जबाबदारी आहे. मात्र आतापर्यंत नागपूर वन विभाग केवळ बघ्याची भूमिका वठवित आला आहे. एखादा मोर वस्तीत पोहोचल्याची माहिती मिळाली, तर तेथे दोन वन कर्मचाऱ्यांना पाठवायचे आणि त्या मोराला ताब्यात घ्यायचे. वन विभाग केवळ एवढीच स्वत:ची जबाबदारी समजत आहे. परंतु गत महिनाभरापासून सतत घडत असलेल्या या घटनांमागील कारणांचा शोध घेऊन, त्यांना रोखण्याचा कोणताही प्रयत्न झालेला दिसून येत नाही. गत १२ आॅगस्ट रोजी त्रिमूर्तीनगर परिसरातील मोखारे कॉलेजच्या परिसरात असाच एक मोर आढळून आला होता.
परिसरातील काही लोकांना तो दिसताच, त्याची वन विभागाला माहिती देण्यात आली. त्यावर सेमिनरी हिल्स येथील वन विभागाचे बचाव पथक घटनास्थळी पोहोचून, त्याला ताब्यात घेतले. आणि सायंकाळी पुन्हा त्याला गोरेवाडा जंगलात सोडण्यात आले.
मात्र त्यापूर्वी ७ आॅगस्ट रोजी वर्धा मार्गावरील उज्ज्वलनगर परिसरातही असाच एक मोर आढळून आला होता. शिवाय त्याच दिवशी प्रतापनगर पोलीस ठाण्यात पुन्हा एका अज्ञात व्यक्तीने मोर आणून दिल्याची वन विभागाला माहिती मिळाली. ४ आॅगस्ट रोजी सेमिनरी हिल्स परिसरातील व्हेटरनरी कॉलेजच्या परिसरात एक जखमी मोर पोहोचला होता. जाणकारांच्या मते, हे सर्व मोर शहराच्या सभोवताल असलेल्या झुडपी जंगलातील आहे. परंतु गत काही दिवसांपासून त्यांचा हा अधिवास असुरक्षित झाला आहे. काही असामाजिक तत्त्वांनी तेथे उपद्रव माजवला आहे. अशा स्थितीत या राष्ट्रीय पक्षाचे संरक्षण करणे, वन विभागाचे प्राथमिक कर्तव्य आहे.
शहरातील मोरांचा अधिवास
शहरातील अंबाझरी परिसरासह व्हीआरसी कॅम्पस, बॉटनिकल गार्डन, दाभा परिसर, सेमिनरी हिल्स, नारा परिसर, कृषी महाविद्यालयाची शेती, जयताळा (विमानतळ) व गोरेवाडा परिसरात शेकडो मोरांचा अधिवास आहे.
या सर्व परिसरात हिरव्यागार झुडपी जंगलासह पिण्यासाठी मुबलक पाणी आहे. त्यामुळे येथील मोरांच्या संख्येत सतत वाढ होत आहे. परंतु अलीकडे त्यांच्यावर शहरातील काही शिकाऱ्यांची वक्रदृष्टी पडली आहे. विशेष म्हणजे, मोरांचा अधिवास असलेला हा सर्व परिसर वन विभागासह वेगवेगळ्या संस्थांच्या अधिकारात आहे. त्यामुळे येथील मोरांना कोणतेही संरक्षण मिळत नाही. शिकारी त्याचाच फायदा घेऊन, त्यांना टार्गेट करीत आहे.