मोदींच्या स्वच्छता अभियानासाठी पवारांनी हाती घेतला झाडू

By Admin | Updated: November 14, 2014 10:56 IST2014-11-14T10:56:33+5:302014-11-14T10:56:33+5:30

मोदी यांच्या स्वच्छ अभियानासाठी शुक्रवारी सकाळी पवार कुटुंबीय हातात झाडू घेऊन रस्त्यावर उतरले व स्वच्छ बारामतीचा नारा दिला.

Pawar took over the Modi sweeping campaign | मोदींच्या स्वच्छता अभियानासाठी पवारांनी हाती घेतला झाडू

मोदींच्या स्वच्छता अभियानासाठी पवारांनी हाती घेतला झाडू

ऑनलाइन लोकमत
बारामती, दि. १४ - विधानसभेत भाजपाला बिनशर्त पाठिंबा देणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा नरेंद्र मोदींना साथ दिली आहे. मोदी यांच्या स्वच्छ अभियानासाठी शुक्रवारी सकाळी पवार कुटुंबीय हातात झाडू घेऊन रस्त्यावर उतरले व स्वच्छ बारामतीचा नारा दिला. 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छता अभियान सुरु केले असून शुक्रवारी जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीनिमित्त बारामतीमध्ये हे अभियान राबवण्यात आले. या अभियानात दस्तुरखुद्द शरद पवार हातात झाडू घेऊन साफसफाईसाठी रस्त्यावर उतरले होते. विशेष म्हणजे या मोहीमेत शरद पवार यांच्यासोबत सुप्रिया सुळे, अजित पवार यांनीही हातात झाडू घेतला होता. पवार यावरच थांबले नाहीत. आदर्श ग्राम योजनेंतर्गत प्रत्येक खासदाराने एक गाव दत्तक घेऊन त्याचा विकास करावा असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले होते. पवारांनी मोदींच्या या आवाहनालाही दाद दिली आहे. पवारांचे निकटवर्तीय व राष्ट्रवादीचे नेते डी.पी. त्रिपाठी यांनी बारामतीतील मूर्ती हे गाव दत्तक घेतले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीनेही 'चलो चले मोदी के साथ' असा नारा दिल्याचे दिसते. बारामतीकरांनी दर सोमवारी स्वच्छता अभियान राहून बारामतीला स्वच्छ ठेवावे असे आवाहनही पवारांनी याप्रसंगी केले. 
 
आधीपासून स्वच्छ असलेल्या रस्त्याची फडणवीसांनी केली सफाई
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील धोबीघाट येथे स्वच्छता मोहीम राबवली. या मोहीमेत फडणवीस यांनी हातात झाडू घेऊन सफाई केली. मात्र फडणवीस यांनी ज्या रस्त्याची सफाई केली तो रस्ता मुख्यमंत्री येण्यापूर्वीच सफाई कामगारांनी स्वच्छ करुन ठेवला होता असे वृत्तवाहिनीने म्हटले आहे. त्यामुळे फडणवीस यांची साफसफाई केवळ 'दिखाऊ' होती का असा सवाल उपस्थित केला जात आहे. 

 

Web Title: Pawar took over the Modi sweeping campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.