पवारांना पुरून उरलो... ‘हे’ कोण?
By Admin | Updated: January 30, 2015 22:15 IST2015-01-30T22:12:13+5:302015-01-30T22:15:33+5:30
पालकमंत्र्यांची सडेतोड भाषा : ‘लोकमत’च्या कार्यालयात तासभर दिलखुलास गप्पा; विजय शिवतारेंनी स्पष्ट केले भविष्यातील इरादे--थेट संवाद

पवारांना पुरून उरलो... ‘हे’ कोण?
सातारा : ‘विधानसभा निवडणुकीवेळी सर्वच पक्षांमधील बड्या नेत्यांना माझ्या विरोधात पुरंदर तालुक्यात बोलावण्यात आले. शरद पवार, अजित पवार तर प्रस्थापित. परंतु जनतेची कामे केल्यामुळे मी सर्वांना पुरून उरलो. जिल्ह्यात पालकमंत्री म्हणून काम करताना मला घेरण्याचा प्रयत्न करणारे नेते या प्रस्थापितांपुढे काहीच नाहीत..’ अशा सडेतोड भाषेत विजय शिवतारे यांनी भविष्यातील इरादे स्पष्ट केले.राष्ट्रवादीचे प्रभावक्षेत्र असलेल्या सातारा जिल्ह्याचे पालकमंत्रिपद स्वीकारल्यानंतर नियोजन समितीच्या पहिल्याच बैठकीत आक्रमक शैलीची चुणूक दाखविल्यानंतर शिवतारे यांनी ‘लोकमत’च्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. सहकाऱ्यांशी दिलखुलास संवाद साधताना त्यांनी प्रस्थापितांना कानपिचक्या देत जिल्ह्याचा विकास खुंटण्याची ‘राजकीय’ कारणे सांगितली. ‘राष्ट्रवादीच्या आमदारांची संख्या जास्त असताना पालकमंत्री म्हणून मी काय करणार? मला काय माहीत असणार, असा ग्रह करून घेतलेल्या प्रस्थापितांनी मला घेरण्याची व्यूहरचना केली खरी; पण मला असले दबावतंत्र बिलकूल आवडत नाही. कारण, मी सखोल ज्ञान घेऊनच बोलतो. प्रश्न आणि त्यांची उत्तरे अधिकाऱ्यांपेक्षा जास्त मला माहीत असतात. प्रस्थापित आमदारांनी त्याचा अनुभव नियोजन समितीच्या बैठकीत घेतला; त्यामुळेच त्यांची व्यूहरचना यशस्वी झाली नाही,’ असे त्यांनी सांगितले. आपली नाळ थेट जनतेशी जोडली गेल्यामुळे मार्गात कुणीच अडथळा आणू शकले नाही, असे सांगताना शिवतारे म्हणाले, ‘पुरंदर तालुक्यात मोठे प्रकल्प आले. तरुणांना रोजगार मिळाला. सर्वाधिक सिमेंट बंधारे झाले. पाणलोट विकासाच्या योजनांची माहिती करून घेतली आणि त्या यशस्वीरीत्या राबविल्या. अशी कामे केली तर लोकांच्या मनात स्थान निर्माण करता येते. मग प्रचाराला वेळ कमी दिला, तरी चालते. मी केवळ पाच दिवस प्रचार केला आणि निवडून
आलो.’ (प्रतिनिधी)
‘लोकमत’च्या ‘स्टिंग आॅपरेशन’चे कौतुक
‘लोकमत’ने महिलांच्या सुरक्षेसाठी राबविलेल्या धाडसी ‘स्टिंग आॅपरेशन’चे पालकमंत्र्यांनी तोंडभरून कौतुक केले. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न महत्त्वाचा असल्याचे सांगतानाच पुण्यात काही स्वयंसेवी संस्था आणि महिला संघटनांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या प्रयत्नांचा अभ्यास करण्यात येईल आणि त्या धर्तीवर साताऱ्यासाठी योजना आखण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा इरादाही त्यांनी व्यक्त केला.
पालकमंत्र्यांचा
असा आहे ‘अजेंडा’
साताऱ्यात मोठे उद्योग येण्याच्या दृष्टीने पायाभूत सुविधांच्या विकासाला प्राधान्य
कोयना प्रकल्पग्रस्तांना १८ नागरी सुविधांसाठी भाटघरच्या धर्तीवर प्रयत्न करणार
वैद्यकीय महाविद्यालय आणि अत्याधुनिक रुग्णालयाच्या उभारणीला प्राधान्य
खंबाटकी बोगद्यानंतरचे धोकादायक वळण काढून टाकणार
पुणे-सातारा रस्त्यावर खंबाटकी घाटात दुसऱ्या बोगद्यासाठी प्रयत्न
माहुली येथील शंभर वर्षांपूर्वीच्या कृष्णा पुलाची स्थिती तपासून पर्यायी पुलाबाबत योग्य निर्णय
कोयना ‘इको सेन्सिटिव्ह झोन’ असल्याने अल्प मोबदल्यासाठी पर्यटन वाढविणे अनुचित
महिला सुरक्षिततेसाठी विविध विभागप्रमुखांशी बोलून उपाययोजना करणे
पोलिसांसाठी शहरात कमी मोबदल्यात अद्ययावत निवासस्थाने निर्माण करण्यास प्राधान्य.
नेत्यांना हाताशी धरुन राजकारण नाही
नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्र्यांना घेरण्याच्या विरोधकांच्या खेळीत उदयनराजेंची प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत झाल्याची चर्चा साताऱ्यात सुरू आहे. यासंदर्भात शिवतारे यांनी उदयनराजेंशी आपली मैत्री अनेक वर्षांपासूनची असल्याचे नमूद केले. ‘मैत्रीचा फायदा मी चांगल्या कामांसाठी निश्चित करून घेर्ईन; परंतु कोणत्याही नेत्याला हाताशी धरून राजकारण कधीच करणार नाही. मी नेहमीच जनतेबरोबर राहिलो; राहीन. विकासासाठी समाजकारण करावे. राजकारण ही ओघाने येणारी अपरिहार्यता आहे,’ असे ते म्हणाले.
जिल्ह्यातील नेते जनतेपासून दूर
‘प्रश्न धरणग्रस्तांचा असो, पुनर्वसनाचा असो किंवा अन्य कोणताही असो, जिल्ह्यातील नेते ‘माझं कोरेगाव’, ‘माझं फलटण’ करीत राहिले. जिल्ह्याचा समग्र विचार कुणीच केला नाही. नेते जनतेपासून दूर असल्यामुळे विकासाची ‘व्हिजन’ त्यांच्याकडे नाही.
साताऱ्यात आल्यावर हे जिल्ह्याचे ठिकाण आहे, असे वाटतही नाही,’ अशा शब्दांत स्थानिक नेत्यांना चिमटे काढून शिवतारे यांनी जिल्ह्यात विकासाला मोठा वाव असल्याचे सांगितले.
पोलिसांची स्थिती सुधारणार
‘गुन्हेगारीसंदर्भात तपास करताना पोलिसांना अनेकदा राजकीय दबाव, हस्तक्षेपाला सामोरे जावे लागते. अनेक ठिकाणी बदल होणे अपेक्षित आहे आणि माझ्या कारकिर्दीत ते होतील,’ असे सांगतानाच पोलिसांची स्थिती सुधारण्याची नितांत गरज असल्याचे पालकमंत्र्यांनी नमूद केले. ‘पोलीस छोट्या घरांत, वाईट वातावरणात राहतात. खरे तर सरकारी नियमानुसार पोलीस वसाहतींसाठी एक ऐवजी चार ‘एफएसआय’ देण्याची तरतूद आहे. क वर्ग नगरपालिका असणाऱ्या शहरांत जमिनीच्या किमती जास्त आहेत. तिथे या नियमाचा वापर करून पोलिसांसाठी चांगल्या इमारती उभारता येतील. त्या दृष्टीने मी निश्चित प्रयत्न करेन,’ असे आश्वासन त्यांनी दिले.