शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी पवार रस्त्यावर!

By Admin | Updated: August 15, 2015 00:41 IST2015-08-15T00:41:13+5:302015-08-15T00:41:13+5:30

पावसाअभावी दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार शुक्रवारी रस्त्यावर उतरले! जिल्हा राष्ट्रवादी

Pawar questions on farmers' roads! | शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी पवार रस्त्यावर!

शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी पवार रस्त्यावर!

उस्मानाबाद : पावसाअभावी दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार शुक्रवारी रस्त्यावर उतरले! जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे येथे निघालेल्या विराट मोर्चाचे पवार यांनी नेतृत्व केले. समाजवादी काँग्रेसचे अध्यक्ष असताना १९८० मध्ये पवारांच्या नेतृत्वाखाली राज्यात शेतकरी दिंडी काढण्यात आली होती. त्यानंतर तब्बल ३५ वर्षानंतर दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर त्यांनी पुन्हा दंड थोपटले आहेत.
गाडीला जुंपलेलं खोंड चकार धरून चालत नाही. तेव्हा गाडी कुठे चालली, याचा गाडी चालविणाऱ्यालाही पत्ता लागत नाही, अशीच परिस्थिती सत्ताधाऱ्यांची झाली आहे. ज्यांच्याकडून मदतीची अपेक्षा आहे. ते तोंड फिरवित आहेत. पंतप्रधानांनी तर अधिवेशन काळात संसदेला तोंडही दाखविले नाही. त्यामुळे आता केवळ मोर्चा काढून थांबता येणार नाही. शेतकऱ्यांच्या मागण्या शासनाने महिनाभरात मार्गी लावाव्यात. अन्यथा उस्मानाबादसह बीड, लातूर आणि परभणी जिल्ह्यांत जनावरांसह जेलभरो आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जनसमुदायास त्यांनी मार्गदर्शन केले. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी खा. डॉ. पद्मसिंह पाटील, महिला आघाडीच्या अध्यक्षा आ. विद्या चव्हाण आदी उपस्थित होते.
लोकांनी मोठ्या अपेक्षेने भाजपाला सत्ता दिली. मात्र आता सर्वसामान्यांचा भ्रमनिरास होत असल्याचे सांगत, नैसर्गिक संकटामुळे मराठवाड्यातील शेतकरी उद्ध्वस्त होत असताना त्याचे सरकारला सोयर-सूतक नसल्याचे ते म्हणाले. भगवी कपडे घालून नको ते प्रश्न, नको ते मुद्दे उकरून काढले जात आहेत. त्यात राज्यातील सत्ताधाऱ्यांचाही सहभाग आहे. शेतकऱ्यांचे दु:ख जाणून घेण्यासाठी मराठवाडा दौऱ्यावर आल्याचे ते म्हणाले. १४ सप्टेंबरपर्यंत मागण्यांची पूर्तता न केल्यास जेलभरो आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.
बिहार निवडणुकांना मी महत्त्वाचे मानतो. स्वातंत्र्याचा लढा खऱ्या अर्थाने बिहारमधूनच सुरू झाला. जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनाचे बीजसुद्धा तेथेच रोवले गेले होते. आजही बिहार देशाला दिशा देऊ शकते, असा मला विश्वास वाटतो. त्यामुळेच नितीश कुमार आणि मुलायम सिंह यादव यांना काही मदत करता येते का? यासाठी डाव्या पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)

मुख्यमंत्र्यांना केले लक्ष्य
मी मराठवाड्याच्या दौऱ्यावर आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आघाडी शासनाने १५ वर्षांत काय केले?, असा प्रश्न केला आहे. मुख्यमंत्र्याचे ज्ञान अगाध आहे. यंदा पाऊस पडला नाही, त्याला मी काय करणार असे ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांना पोरकटपणाची उत्तरे शोभत नसल्याचे त्यांनी सांगितले. संकटे येतात, त्यातून मार्ग काढावा लागतो, असे त्यांनी स्पष्ट केले.

कृत्रिम पावसावरही भाष्य : राज्यात यापूर्वी दुष्काळी परिस्थितीत कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तो अनुभव काही फारसा चांगला नव्हता, असे ते म्हणाले.

मोदींवर टीका : सभागृहात आम्हाला दुष्काळी परिषदेवर चर्चा करायची होती. मात्र पंतप्रधानांनी चर्चा तर सोडाच, २० दिवस सभागृहात दर्शनही दिले नाही. आता उद्या त्यांचे ‘भाईयो और बहनों’ तेवढे ऐकायला मिळेल, अशी टीका पवार यांनी केली.

Web Title: Pawar questions on farmers' roads!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.