राष्ट्रवादीच्या बॅनरवर पवार-मोदी एकत्र !
By Admin | Updated: November 17, 2014 04:28 IST2014-11-17T04:28:25+5:302014-11-17T04:28:25+5:30
देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला राष्ट्रवादीचा आतून पाठिंबा, बाहेरून पाठिंबा की छुपा पाठिंबा, हे गुऱ्हाळ सुरू असताना घाटकोपरमध्ये स्वच्छता अभियानात राष्ट्रवादी सामील झाल्याचे चित्र दिसले.

राष्ट्रवादीच्या बॅनरवर पवार-मोदी एकत्र !
मनीषा म्हात्रे, मुंबई
देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला राष्ट्रवादीचा आतून पाठिंबा, बाहेरून पाठिंबा की छुपा पाठिंबा, हे गुऱ्हाळ सुरू असताना घाटकोपरमध्ये स्वच्छता अभियानात राष्ट्रवादी सामील झाल्याचे चित्र दिसले. या अभियानाच्या बॅनरवर शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकत्र झळकल्याने सगळ््यांच्याच भुवया उंचावल्या. बारामतीत राष्ट्रवादीने स्वच्छता अभियान राबवल्यानंतर मुंबईतही स्वच्छता अभियानात राष्ट्रवादी ‘आतून’च सामील झाली आहे.
घाटकोपरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसतर्फेराष्ट्रवादी काँंग्रेसचे तालुकाध्यक्ष राजू घुगे आणि राष्ट्रवादीच्या नगरसेविका प्रतीक्षा घुगे यांनी स्वच्छता अभियान आयोजित केले होते. या अभियानाच्या जाहिरातीत शरद पवारांसह नरेंद्र मोदी यांचा फोटो लागल्याने आणि या कार्यक्रमात राष्ट्रवादीवर सडकून टीका करणारे भाजपाचे प्रवक्ते अवधूत वाघ यांच्यासह भाजपाचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाल्याने जनतेने आश्चर्य व्यक्त केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांधी जयंतीच्या दिवशी संपूर्ण देशात स्वच्छ भारत अभियानाला सुरुवात
केली.
निवडणुकीपूर्वीच देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचा पाठिंबा कोणत्याही परिस्थितीत घेणार नाही, असे अत्यंत स्पष्टपणे सांगितले होते. पण निवडणुकीचा निकाल लागला आणि स्पष्ट बहुमत अभावी राष्ट्रवादीचा टेकू भाजपाला घ्यावाच लागला. त्यामुळे राष्ट्रवादीलाही तरतरी आली. त्यामुळे हे स्वच्छता अभियान त्याच ‘युती’चा भाग तर नाही ना, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या संदर्भात राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजू घुगे यांना विचारले असता ते म्हणाले की, नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. पंडित नेहरूंच्या जयंतीदिनी शरद पवारांनी बारामतीत स्वच्छ भारत अभियान राबवले होते. आम्ही राहतो तो विभाग आमचे घर समजून आम्ही येथेही हे अभियान राबवले आहे. नरेंद्र मोदींनी देशाला स्वच्छ भारत अभियानाचा कार्यक्र म दिल्याने त्यांचा फोटो आम्ही आमच्या बॅनरवर लावला. निवडणुका संपल्यानंतर राजकारण करण्यापेक्षा जनतेची कामे करणे गरजेचे आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना जसे कार्यक्रमाचे निमंत्रण दिले, तसेच भाजपाचे पदाधिकारी आणि प्रवक्त्यांनाही निमंत्रण दिल्याने ते देखील या कार्यक्रमाला हजर होते, असे घुगे यांनी
सांगितले.
नेहमीच राष्ट्रवादीवर कडाडून टीका करणारे भाजपाचे प्रवक्ते अवधूत वाघ यांना राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात सहभागी होण्याबाबत तसेच पंतप्रधान मोदी यांच्या फोटोबाबत विचारले. ते म्हणाले, की स्वच्छता अभियान हा काही भाजपाचा कार्यक्र म नाही, तो पंतप्रधानांचा सरकारी कायक्रम आहे. त्यामुळे त्यात कोणीही सहभागी होऊ शकतो. पंतप्रधानांनी जेव्हा या अभियानाचे पहिले नऊ दूत नेमले, त्यात काँग्रेसचे शशी थरूर देखील होतेच. गांधीजी हे जसे कोणा एका पक्षाचे नाहीत तसेच त्यांच्या नावाने सुरू केलेले हे अभियान देखील कोणा एका पक्षाचे नाही. तसेच जर अन्य पक्षाचा नेता पंतप्रधानांचा फोटो त्यांचा पक्षाचा बॅनरवर टाकत असेल, तर कदाचित हे त्याचे मतपरिवर्तन असू शकेल.