एकादशीच्या मुहूर्तावर पाटपूजन सोहळे
By Admin | Updated: July 14, 2016 21:09 IST2016-07-14T21:09:12+5:302016-07-14T21:09:12+5:30
आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी वारकऱ्यांची अलोट गर्दी पंढरपूरमध्ये झालेली आहे. मात्र एकादशीच्या शुभ मुहूर्तावर मुंबईकरांना वेढ लागले आहे, ते म्हणजे

एकादशीच्या मुहूर्तावर पाटपूजन सोहळे
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १४ - आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी वारकऱ्यांची अलोट गर्दी पंढरपूरमध्ये झालेली आहे. मात्र एकादशीच्या शुभ मुहूर्तावर मुंबईकरांना वेढ लागले आहे, ते म्हणजे गणेशोत्सवाचे. याच कारणास्तव मुंबईतील बहुतेक गणेशोत्सव मंडळांनी एकादशीचा मुहूर्त साधत गुरूवारी पाटपूजन आणि माती पूजन सोहळ््याचे आयोजन केले आहे.
याबाबत गिरणगावातील जुने मंडळ असलेले घोडपदेव सार्वजनिक उत्सव मंडळाचे पदाधिकारी आशिष चव्हाण यांनी सांगितले की, गणेशोत्सवाची सुरूवात एकादशी या पावनदिनी करण्याचा निर्णय मंडळाने घेतला. यंदा मंडळाचे ८२ वे वर्ष आहे. उत्सवात कोणतेही विघ्न येऊ नये, म्हणूनच एकादशीसारख्या पावनदिनी माती पूजन सोहळा आयोजित करण्याचे ठरविले. भायखळा पूर्वेकडील घोडपदेव परिसरातील गोठेश्वर मैदानात सायंकाळी चार वाजता माती पूजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.
काळाचौकी येथील लाडका लंबोदर म्हणून प्रसिद्ध असलेले रंगारी बदक चाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा ७७ व्या वर्षात पदार्पन करत आहे.
एकादशीच्या मुहूर्तावर मंडळाने सायंकाळी पाच वाजता पाट पूजन सोहळा आयोजित केला आहे. या सोहळ््याची रंगत वाढवण्यासाठी मंडळाने नालासोपारा येथील मराठेशाही ढोल पथकाची मानवंदना ठेवली आहे. याशिवाय चाळीच्या
पटांगणात एका बेंजो पथकाच्या तालावरही कार्यकर्ते थिरकताना दिसतील, अशी माहिती कार्यकारी मंडळाने दिली.
एकादशीसोबत गणेशोत्सवाची झिंग
एकंदरीतच राज्यात वारीचा उत्साह असताना, मुंबईत एकादशीच्या सोबतीला गणेशोत्सवाचा दुग्धशर्करा योग पाहायला मिळेल. टाळासोबत ढोल पथकांच्या जुगलबंदीवर मुंबईकर दंग होऊन नाचताना दिसतील. त्यामुळे यंदाची आषाढी एकादशी खऱ्या अर्थाने वेगळी दिसेल, यात शंका नाही.