पाटे, वरवंटे, खलबत्ते चालले मिक्सरमुळे विस्मृतीत
By Admin | Updated: June 10, 2016 03:28 IST2016-06-10T03:28:02+5:302016-06-10T03:28:02+5:30
दगड काम करणारा वडार -पाथरवट समाज हा व्यवसायिक काळाच्या ओघात अडचणीत सापडला आहे़

पाटे, वरवंटे, खलबत्ते चालले मिक्सरमुळे विस्मृतीत
राहुल वाडेकर,
तलवाडा- परंपरेने पिढीजात चालत आलेला दगड काम करणारा वडार -पाथरवट समाज हा व्यवसायिक काळाच्या ओघात अडचणीत सापडला आहे़ त्यातही या समाजाची व्यथा ही वेगळीच म्हणावी लागेल ़भटकंती करुन संसाराचा गाडा हाकलताना त्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागतेच पण वाढत्या महागाईत कसा तग धरुन राहायचे, हा प्रश्न त्यांच्या अस्तित्वाचा ठरतो आहे. हातावर काम करणारी आणि गावोगावी फिरत पाटयाला टाके लाऊन घ्या वो ताई, अशी आरोळी देणारा कारागीर सध्या शहरातच काय पण गावातही दिस नाही़ घरातील पाटा-वरवंटयांची जागा आधुनिक मिक्सरने घेतल्याने दगडापासून पाटा, वरवंटा, खलबत्ते बनविणाऱ्या कारागिरांच्या व्यवसायाला घरघर लागली आहे़
दहा-पंधरा वर्षापूर्वी घरातील स्वयंपाक खोलीत दगडी पाटी-वरवंटयाला हक्काचे व मानाचे स्थान होते़ पाटा वरवंटयावर केलेल्या वाटणाची चव आजच्या मिक्सरमधील चटणीला येत नसली तरी आजच्या धावपळीच्या जगात या वस्तू अडगळीच्या वाटू लागल्या आहेत़ त्यामुळे नविन पाटे वरवंटे विक्री खरेदी करणे वा त्या वस्तूंना टाके लावुन घेण्याचे प्रमाणही कमी झाल्याने पाथरवट व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे़
ग्रामीण भागात काही ठिकाणी गृहपयोगी कामासाठी दगडी वस्तूंचा वापर जास्त होतांना दिसत असला तरी शहरीकरणाचे वारे वेगाने वाहू लागल्याने घरातील पाटा वरवंटा किती काळ तग धरेल हे सांगता येत नाही़ ग्रामीण भागात भारनियमन मोठया प्रमाणात होत असल्याने या काळात या वस्तूंची निवड जाणवते़ घरात मूल जन्माला आल्यानंतर त्याच्या पाचवीच्या कार्यक्रमाला पाटा तर बारशाच्या दिवशी वरवंटयासाठी शोधाशोध सुरु होते़ म्हणून या दोन वस्तू टिकून आहेत.