बोरीवलीतील चिकूवाडीतील रस्त्यांवर खड्डेच खड्डे
By Admin | Updated: August 1, 2016 02:12 IST2016-08-01T02:12:47+5:302016-08-01T02:12:47+5:30
सामान्य लोकांच्या वापरात असलेल्या आणि खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्याची पालिकेकडे वारंवार तक्रार करूनही त्याकडे ढुंकून पहिले जात नाही

बोरीवलीतील चिकूवाडीतील रस्त्यांवर खड्डेच खड्डे
गौरी टेंबकर - कलगुटकर,
मुंबई- सामान्य लोकांच्या वापरात असलेल्या आणि खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्याची पालिकेकडे वारंवार तक्रार करूनही त्याकडे ढुंकून पहिले जात नाही. मात्र तोच रस्ता एखादा व्हीआयपी येणार असला की रातोरात कसा काय दुरुस्त होतो, असा प्रश्न गोराईतील रहिवाशांना पडला आहे. बोरिवली पश्चिमच्या चिकूवाडी रस्त्याची पाहणी ‘लोकमत’ टीमने केली. त्या रस्त्यावर देखील काही अंतर सोडून खड्डे पडलेले होते. पावसामुळे या खड्ड्यांत पाणी साचल्यामुळे तारेवरची कसरत करत स्थानिकांना त्यांची वाहने न्यावी लागत होती. ज्यामुळे भरपावसात तिथल्या भयाण परिस्थितीचा अंदाज सहजपणे येत होता.
>बायको-पोरांना घेऊन पडलो
कुटूंबियांसोबत स्कूटीवरून घेऊन जात असताना या खड्ड्यात गाडी उलटली. माझ्या कण्याला आणि बायकोच्या हातापायाला दुखापत झाली. नशिबाने बाळाला जास्त लागले नाही. पण ते लागले असते आणि काही कमी जास्त झाले असते तर काय केले असते. कोणाचा गळा धरला असता. पालिका खड्डे बुजवायचे काम नावापुरते करते. पण त्यांच्या या अशा हलगर्जीपणामुळे एखाद्याच्या जीवावर बेतू शकते याची साधी कल्पना तरी आहे पालिका प्रशासनाला कल्पना नाही.
- चंदन अधिकारी, स्थानिक
>व्हीआयपी व्हिझिटपुरता रस्ता ‘टिपटॉप’
गेली ४० वर्षे याठिकाणी राहतो. १३ चिकूवाडी मैदानात काही दिवसांपूर्वी एक मोठी सभा झाली. ज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आले होते. ते याच मैदानात येणार असल्याची माहिती मिळताच पालिकेने रातोरात चिकूवाडी रस्त्याचा कायापालट करुन तो ‘टीपटॉप’ करून टाकला. नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलो. तेव्हा रस्ता पाहून खुश झालो. व्हीआयपी व्हीझिटच्या निमित्ताने का होईना, रस्त्याचे काम झाले असे वाटले. मात्र सभेच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासूनच या रस्त्यांनी त्यांचे खरे रूप दाखवले.
- अनोखा जोशी, स्थानिक
>दर मिनिटाला खड्डे
चिकूवाडी परिसरातच राहत असून कॉलेजला किंवा क्लासेसला जाण्याचा हा नेहमीचा रस्ता आहे. मोटरसायकल वरूनच बहुदा प्रवास करतो. त्यामुळे या खड्ड्यांचा त्रास मला नेहमीच सहन करावा लागतो.रस्त्यावर थोड्या थोड्या अंतरावर मोठमोठे खड्डे आहेत. दर मिनिटाला खड्डेच सापडतील.
- सुनील घाग, विद्यार्थी
>या रस्त्यावर १३ एकर चिकूवाडी पालिका मैदान आहे. बोरिवलीमध्ये कोणीही व्हीआयपी आले की त्यांच्या स्वागतासाठी चिकूवाडी रस्त्याचे असे काही काम केले जाते जसे या रस्त्यावर कधी काळी खरेच खड्डे होते का? असा प्रश्न स्थानिकांना पडतो. रस्त्याचे आयुष्य देखील त्या सभेपुरते मर्यादित असते.
रातोरात या रस्त्याचे रुपडे बदलले जाते. मग थोडी मेहनत स्थानिकांसाठी करण्याची तसदी पालिका का करत नाही, असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे. ज्याचे उत्तर देण्यास मात्र पालिका सक्षम नाही, असेही स्थानिकांचे म्हणणे आहे.