पाऊस जास्त पडल्याने खड्डे अधिक
By Admin | Updated: October 20, 2016 05:56 IST2016-10-20T05:56:07+5:302016-10-20T05:56:07+5:30
पावसाळी दिवस वाढल्यामुळे खड्डे अधिक वाढल्याचा आयुक्त अजय मेहता यांचा दावा, सर्वपक्षीय स्थायी समिती सदस्यांनी आज निमूट मान्य केला.

पाऊस जास्त पडल्याने खड्डे अधिक
मुंबई : पावसाळी दिवस वाढल्यामुळे खड्डे अधिक वाढल्याचा आयुक्त अजय मेहता यांचा दावा, सर्वपक्षीय स्थायी समिती सदस्यांनी आज निमूट मान्य केला. यामुळे खड्ड्यांवरून सुरू असलेले रस्त्यावरील राजकीय आंदोलन म्हणजे, निवडणुकीची तयारीच असल्याचे बोलले जात आहे.
दरवर्षी पावसाळ्यात मुंबई खड्ड्यात जाते. यंदा मात्र, रस्त्यांची स्थिती अधिकच बिकट आहे. त्यात पुढचे वर्ष निवडणुकीचे असल्याने, राजकीय पक्षांसाठी खड्डे हाच ज्वलंत विषय ठरला आहे. पावसाळा थांबला, तरी खड्डे कायम असल्याने आयुक्तांवर अविश्वास ठराव आणण्याची तयारी विरोधी पक्षांच्या मदतीने शिवसेनेने सुरू केली होती. मात्र, आयुक्तांनी कामाची पाहणी केली आहे. त्यामुळे शिवसेनेला माघार घ्यावी लागली आहे. मात्र, खड्डेप्रकरणी स्थायी समितीमध्ये निवेदन करताना आयुक्तांनी आपल्या बचावाचा मार्ग मोकळा केला. मुंबईत १ ते १० आॅक्टोबरपर्यंत पाऊस असल्याने खड्डे भरता आले नाहीत. असा बचाव आयुक्तांनी केला. (प्रतिनिधी)
>असा सुरू झाला खड्ड्यांचा वाद
मुंबईचे रस्ते खड्ड्यात असताना प्रशासनाच्या हास्यास्पद आकडेवारीने नागरिकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले. मुंबईत केवळ ३५ खड्डे असल्याचा दावा पालिका प्रशासनाने केल्यामुळे, सर्वच स्तरातून नाराजीचे सूर उमटू लागले. मुंबईतील खड्डे अधिकाऱ्यांना दाखवण्यासाठी मनसेने रस्ते विभागाच्या प्रमुख अभियंत्याच्या हातात, ‘मी या खड्ड्यांसाठी जबाबदार’ असल्याचे फलक देऊन रस्त्यावर उभे केले. याच्या निषेधार्थ अभियंत्यांनी काम बंद आंदोलन पुकारले.