पाटणकर, तुम्ही पानसरेंच्या रांगेत !
By Admin | Updated: March 18, 2015 00:05 IST2015-03-17T23:50:42+5:302015-03-18T00:05:35+5:30
पत्राद्वारे धमकी : कासेगावच्या घराला संरक्षण; व्यक्तिगत अंगरक्षकही पुरविणार

पाटणकर, तुम्ही पानसरेंच्या रांगेत !
सातारा : धरणग्रस्तांचे नेते डॉ. भारत पाटणकर यांना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या पत्रातील तपशील उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. ‘तुम्ही विशिष्ट समाजघटकाचा अनुनय आणि विशिष्ट वर्गाचा द्वेष का करता,’ असा सवाल पत्रात करण्यात आला असून, ‘तुम्ही कॉ. गोविंद पानसरे यांच्या रांगेत आहात,’ असे पत्रात म्हटले आहे. पानसरेंवरील हल्ल्याच्या घटनेला महिना पूर्ण होण्याच्या दिवशीच पाटणकरांना अनोळखी व्यक्तीने हिंदुत्ववादी विचारांचा पुरस्कार करणाऱ्या वृत्तपत्राचा अंकही पाठविला आहे. दरम्यान, कासेगाव (जि. सांगली) येथील त्यांच्या घराला मंगळवारी संरक्षण देण्यात आले आहे.आपल्याला धमकीचे चार पानी पत्र आल्याचे डॉ. पाटणकर यांनी चार मार्चला ‘लोकमत’शी बोलताना सांगितले होते. हे पत्र कॉ. गोविंद पानसरे यांच्यावरील हल्ल्यानंतर आलेले आहे. एका समाजाचा अनुनय आणि एका समाजाचा द्वेष डॉ. पाटणकर करीत असल्याचा आरोप त्यात असून, ‘त्यामुळे तुम्हीही कॉ. गोविंद पानसरे यांच्या रांगेत आहात,’ असे पत्रात म्हटले आहे.
विशेष म्हणजे या ‘रांगे’त न्या. बी. जी. कोळसे-पाटील यांचेही नाव घेण्यात आले आहे. पानसरेंनी ‘हू किल्ड करकरे’ पुस्तकाचे लेखक एस. एम. मुश्रीफ यांच्याबरोबर मेळावे घेतले, असे पत्रात म्हटले आहे. तत्पूर्वी, पोस्टकार्डवर आलेल्या पत्रातही डॉ. पाटणकर यांच्यावर अनुनय आणि द्वेषाचेच आरोप करण्यात आले होते.
डॉ. पाटणकर मंगळवारी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यांच्या घराला मंगळवारी संरक्षण देण्यात आल्याचा फोन घरून तसेच सांगलीचे पोलीस उपाधीक्षक अभिजित पाटील यांच्याकडूनही आला. व्यक्तिगत अंगरक्षकही त्यांना पुरविण्यात येणार आहे. हा अंगरक्षक प्रशिक्षित असेल. विशेष म्हणजे, सांगलीच्या दौऱ्यात हा अंगरक्षक डॉ. पाटणकर यांच्या समवेत होता; पण त्यांनाच याची माहिती नव्हती. पाटील यांचा फोन आल्यावरच डॉ. पाटणकरांना ते समजले. (प्रतिनिधी)
धमकीच्या पत्राचा तपशील जाहीर केल्यानंतर मला राज्यभरातून फोन आले. अघटित घडेपर्यंत आम्ही थांबणार नाही. ‘आम्ही सारे पाटणकर’ म्हणण्याची वेळ स्वत:वर येऊ देणार नाही, अशा संतप्त प्रतिक्रिया कार्यकर्ते देत आहेत. शांततामय आंदोलनाचा मार्गच पुढे सुरू ठेवावा, असे मी कार्यकर्त्यांना सांगितले आहे; परंतु चळवळीवर प्रेम करणारे राज्यभरातील कार्यकर्ते कशी प्रतिक्रिया देतील, हे मी सांगू शकत नाही, हे सरकारने ध्यानात घ्यावे.
- डॉ. भारत पाटणकर,
धरणग्रस्तांचे नेते