मेडिकलमध्ये प्रवेशासाठी पास

By Admin | Updated: August 29, 2014 01:04 IST2014-08-29T01:04:46+5:302014-08-29T01:04:46+5:30

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) आता एका रुग्णासोबत दोनच नातेवाईकांना आत जाता येईल, तर वॉर्डात रुग्णासोबत एकाच नातेवाईकाला राहता येईल. यासाठी ‘पासेस सिस्टीम’

Passing for medical admission | मेडिकलमध्ये प्रवेशासाठी पास

मेडिकलमध्ये प्रवेशासाठी पास

नवीन प्रणाली लागू : रुग्णासोबत एकच नातेवाईक
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) आता एका रुग्णासोबत दोनच नातेवाईकांना आत जाता येईल, तर वॉर्डात रुग्णासोबत एकाच नातेवाईकाला राहता येईल. यासाठी ‘पासेस सिस्टीम’ सुरू करण्यात आली आहे. गुरुवारी सकाळी याचे उद्घाटन अधिष्ठाता डॉ. राजाराम पोवार यांच्या हस्ते झाले.
मेडिकलमध्ये १२०० वर रुग्ण भरती असतात. यात एका रुग्णासोबत दोनपेक्षा जास्त नातेवाईक असतात. साधारण चार हजाराच्यावर रुग्णांचा राबता रुग्णालयात असतो. यामुळे उपचारापासून ते सफाईच्या कामापर्यंत अनेक अडचणी निर्माण होतात. यातच रुग्णालयात मनुष्यबळाची संख्या कमी आहे. समस्यांचे निराकरण होण्यापेक्षा त्या वाढतच होत्या. यावर उपाय म्हणून वैद्यकीय उपअधीक्षक डॉ. सुभाष ठाकरे यांनी ‘पास सिस्टीम’ सुरू करण्याचा प्रस्ताव तयार केला. याला अधिष्ठाता डॉ. पोवार यांनी लागलीच मान्यता दिली. आज सकाळी गेट क्रमांक १ येथे या प्रणालीचे उद्घाटन झाले. यावेळी अधिष्ठाता डॉ. पोवार यांच्यासोबत नगरसेवक गुड्डू तिवारी, डॉ. आर.पी सिंग, वैद्यकीय अधीक्षक डॉ. जगदीश हेडाऊ, डॉ. नरेंद्र तिरपुडे, ईएनटी विभागाचे प्रमुख डॉ. अपूर्व पावडे, डॉ. सुभाष ठाकरे, डॉ. मरारी सिंग आदी उपस्थित होते.
अशी असणार प्रणाली
डॉ. ठाकरे यांनी सांगितले, रुग्णालयात भरती असलेल्या सर्व रुग्णांना पासेस वितरित करण्यात आल्या आहेत. नव्याने भरती होणाऱ्या रुग्णांना रजिस्ट्रेशन करताना पास देण्यात येईल. पासेसवर रुग्णाचे नाव, तारीख, वेळ नमूद करण्यात येणार आहे. यामुळे नातेवाईकांचाच रुग्णालयात प्रवेश राहील. सोबतच पासेसला मुदत देण्यात आली आहे. त्यात वाढ करण्यासाठी परिचारिकांपासून वैद्यकीय अधिकाऱ्यांना अधिकार दिले आहेत. एका पासवर दोन नातेवाईकांना सोडण्यात येईल. यातही एक वॉर्डात तर दुसरा प्रतिक्षालयात राहील. दुपारी ४ ते ७ वाजता ही रुग्णांना भेटण्याची वेळ आहे. यावेळेत एक नातेवाईक दुसऱ्या नातेवाईकाला पास हस्तांतरण करेल. याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी रुग्णालयाचे अनेक सर्वच छोटे प्रवेशद्वार बंद करण्यात आले आहेत. फक्त दोन प्रवेशद्वारावरून नातेवाईकांना रुग्णालयाच्या आत सोडण्यात येईल. या प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षक असणार आहे. ते पासेसची तपासणी करूनच आत सोडतील. (प्रतिनिधी)

Web Title: Passing for medical admission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.