पक्षातील लोकांनीच घात केला - एकनाथ खडसे
By Admin | Updated: September 2, 2016 15:46 IST2016-09-02T15:46:47+5:302016-09-02T15:46:47+5:30
बाहेरचे असते तर लढलो आणि जिंकलोही असतो, पण पक्षातील लोकांनीच, ज्या स्वकीयांना मोठं केलं, त्यांनीच घात केला अशी खंत खडसेंनी व्यक्त केली

पक्षातील लोकांनीच घात केला - एकनाथ खडसे
>- ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. 2 - वेगवेगळ्या आरोपांमुळे मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागलेले ज्येष्ठ भाजपा नेते एकनाथ खडसे यांनी वाढदिवसानिमित्त जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. शक्तिप्रदर्शन करुन आपलं वजन अजूनही जिल्ह्यात तितकंच असल्याचं दाखवून देण्याचा प्रयत्न एकनाथ खडसेंनी यानिमित्ताने केला. वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी हजेरी लावली. सत्ता असो वा नसो मात्र कार्यकर्त्यांचं प्रेम कायम आहे. कार्यकर्त्यांच्या उत्साहामुळे भरुन आलं असल्याची भावना खडसे यांनी व्यक्त केली.
एकनाथ खडसेंनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना पुन्हा एकदा राजीनाम्याचा विषय काढत माझ्याविरोधात एकही पुरावा आजही नाही, पक्ष बदनाम होऊ नये म्हणून राजीनामा दिला असल्याचं सांगितलं. विरोधकांनी खोट्या आरोपातून वातावरण बिघडवलं असल्याचा आरोपही खडसेंनी यावेळी केला. 40 वर्षांपूर्वी ज्या पक्षाला वाणी,मारवाड्यांचा पक्ष म्हणून हिणवायचे,त्या पक्षाला बहुजनांचा पक्ष म्हणून चेहरा दिला असं खडसे बोलले आहेत.
बाहेरचे असते तर लढलो आणि जिंकलोही असतो, पण पक्षातील लोकांनीच, ज्या स्वकीयांना मोठं केलं, त्यांनीच घात केला अशी खंत खडसेंनी व्यक्त केली. एकनाथ खडसेंनी मिडियावरही टीका करताना मिडियाने सळो का पळो करुन सोडलं होतं. एखाद्या माणसाला किती छळावं? मीडियासह सर्व लोक हात धुवून मागे लागले आणि माझी कारकीर्द, तपश्चर्या भंग केली असं बोलले आहेत.