रस्त्यावरील मोऱ्यांचे अर्धवट काम

By Admin | Updated: June 7, 2016 07:42 IST2016-06-07T07:42:18+5:302016-06-07T07:42:18+5:30

सैनवाडी व पोलीस ठाण्यानजीक असलेल्या दोन मोऱ्यांच्या कामांना एक वर्ष पूर्ण होवूनही याठिकाणचे बांधकाम मात्र अर्धवट अवस्थेतच आहे.

Partial work of road moles | रस्त्यावरील मोऱ्यांचे अर्धवट काम

रस्त्यावरील मोऱ्यांचे अर्धवट काम


धाटाव : रोहा-कोलाड रस्त्यावरील धाटाव परिसरातील सैनवाडी व पोलीस ठाण्यानजीक असलेल्या दोन मोऱ्यांच्या कामांना एक वर्ष पूर्ण होवूनही याठिकाणचे बांधकाम मात्र अर्धवट अवस्थेतच आहे. या रस्त्यावर आजही साईडपट्ट्यांचा बऱ्याच ठिकाणी अभाव दिसून येतो. या अर्धवट कामांमुळे अपघातांना निमंत्रण मिळत आहे. सतत वर्दळ सुरू असलेल्या या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनचालकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम खाते याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.
गतवर्षी पावसाळा सुरू होण्याआगोदरच मे महिन्याच्या अखेरीस या दोनही मोऱ्यांची कामे सुरू झाली. या सुरू असलेल्या मोऱ्यांच्या कामांमुळे पर्यायी म्हणून धाटाव औद्योगिक वसाहतीच्या अंतर्गत रस्त्याचा त्याप्रसंगी वाहतुकीकरिता वापर करण्यात आला होता. अवघ्या आठ दिवसांनी शाळा सुरू होणार असून या रस्त्यावर पुन्हा शालेय विद्यार्थीवर्गाची रहदारी वाढणार आहे. सध्या या रस्त्यावरून धाटाव औद्योगिक वसाहतीत येणाऱ्या अवजड वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात आहे. सततचा वर्दळीचा रस्ता म्हणून रोहा-कोलाड रस्ता सुपरिचित आहे. भरधाव जाणाऱ्या वाहनांना या रस्त्यावरील मोऱ्यांच्या अर्धवट बांधकामांचा अंदाज न आल्याने व साईडपट्ट्यांच्या अभावामुळे कित्येक अपघात घडले आहेत. त्यातच रस्त्यालगत असलेल्या मोठमोठ्या वृक्षांचाही अडथळा अपघाताला कारणीभूत ठरत आहे.
एका वर्षापूर्वी सुरू केलेल्या या मोऱ्यांची कामांच्या कार्यारंभ आदेशाची रक्कम ५२ लाख रूपये एवढी आहे. मात्र या दोन मोऱ्यांच्या कामाकरिता आजवर एकूण २५ लाख ५४ हजार रूपये एवढा खर्च झाला आहे. आज या कामाला तब्बल एक वर्ष पूर्ण झाले असून सध्या दोनही मोऱ्यांवरील स्लॅब टाकून झाल्यानंतर दोेन महिन्याच्या कालावधीनंतर या मार्गावरील वाहतूक सुरू करण्यात आली. मात्र या मोऱ्यांलगत असलेल्या कठड्यांचे काम मात्र आजही अर्धवट अवस्थेतच आहेत. या रस्त्यावरून सतत प्रवास करणाऱ्या कामगार, पादचाऱ्यांसह वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. मोऱ्यांवरील कठड्यांचे काम पूण करण्याची मागणी पादचारी करत आहेत.
वाळू नसल्याने काम थांबले; ठेके दाराला दिली नोटीस
मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या धाटाव औद्योगिक वसाहतीत रोजीरोटीकरिता कामगार वर्ग याच रस्त्याने प्रवास करतात. तर बहुतांशी शाळकरी विद्यार्थी या परिसरातील गावागावातून रोह्याकडे सायकलवर शाळेत किंवा कॉलेजमध्ये जातात. अलिबाग, मुरुडकडील पर्यटकांना पुण्याकडे जाण्यासाठी हाच सोयीचा रस्ता आहे. दरम्यान, रस्त्यावरील साईडपट्ट्या बऱ्याच ठिकाणी नसल्यामुळे या मोऱ्यांच्या ठिकाणी रस्त्याचा अंदाज न आल्याने अपघात घडत आहे.
बांधकाम अर्धवट असल्याने मोऱ्यांच्या सळ्या वर आल्याचे दिसते. या ठिकाणचे काम सुरू असताना मध्यंतरी वाळू उपलब्ध नसल्यामुळे काम थांबले असल्याचे ठेकेदाराकडून संबंधित विभागाला सांगण्यात आल्याचे समजते. तर संबंधित विभागीय व उपविभागीय स्तरावर या ठेकेदाराला उर्वरित कामाबाबत नोटीस बजावण्यात आल्याचे रोहा सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता एम.एस. घाडगे यांनी सांगितले.
>रोहा-कोलाड रस्त्यावरील अर्धवट मोऱ्यांच्या कामाबाबत संबंधित ठेकेदाराला नोटीसद्वारे कळविण्यात आले आहे. सदर ठेकेदाराकडून हे काम लवकर न झाल्यास त्याठिकाणी दुसऱ्या ठेकेदाराला काम देऊन उर्वरित काम लवकरात लवकर करण्यात येईल.
- एस.बी. ठाकूर, उपविभागीय अधिकारी,सा.बां. विभाग,रोहा
>संरक्षक कठडे हे संरक्षणासाठी असतात. रस्त्यावरील दोन्ही मोऱ्यांच्या ठिकाणी कठडे नसल्यामुळे वाहनचालकांना अडचण होते.एक वर्ष पूर्ण होवूनही काम अर्धवट राहणे म्हणजे निष्काळजीपणाच म्हणावा लागेल.
- वीरेंद्र पाशिलकर,
सामाजिक कार्यकर्ते
>रस्त्यावरून सायकलवर प्रवास करताना रस्त्यालगत साईडपट्ट्या काही ठिकाणी नाहीत, तर अर्धवट काम झालेल्या मोऱ्यांच्या ठिकाणी संरक्षण कठडे नसल्यामुळे अपघाताची शक्यता जाणवते.
- शार्दूल मोरे, शालेय विद्यार्थी.

Web Title: Partial work of road moles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.